जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाणी व्यवस्थापनावरून हुज्जत;अंगावर धावत, धक्काबुक्की व धमकीचा आरोप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 27, 2026

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाणी व्यवस्थापनावरून हुज्जत;अंगावर धावत, धक्काबुक्की व धमकीचा आरोप..

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाणी व्यवस्थापनावरून हुज्जत;अंगावर धावत, धक्काबुक्की व धमकीचा आरोप..
वालचंदनगर :- इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी (निरवांगी) परिसरातील वितरिका क्रमांक ५७, फाटा क्रमांक १७ येथे पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनाचे काम सुरू असताना जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाखा अभियंता विक्रम विद्याधर गायकवाड (वय ५२) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सुनील कोकरे व दादा भाळे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
        फिर्यादी विक्रम गायकवाड हे निमगाव केतकी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असून त्यांच्या अखत्यारित सुमारे १५ गावे येतात. या गावांमध्ये पाणी सोडण्याचे व्यवस्थापन जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात येते.
        फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गायकवाड हे आपल्या सहकाऱ्यांसह इंदापूर तालुक्यातील वितरिका क्रमांक ५७ च्या फाटा क्रमांक १७ येथे पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनाचे काम करीत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, कालवा निरीक्षक, सुरक्षा रक्षक तसेच कार्यकारी अभियंता यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
       दरम्यान, रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास सुनील कोकरे व दादा भाळे हे तेथे आले. पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
        तक्रारीनुसार, वाद वाढल्यानंतर कार्यकारी अभियंता दिगंबर महादेव दुबल यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली, तसेच कालवा निरीक्षक माधुरी राजकुमार मालवदे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
        अधिकारी व कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती घेऊन वालचंदनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
        या घटनेमुळे पाणी व्यवस्थापनाच्या कामावर असलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्याशी अशा प्रकारे गैरवर्तन होत असल्यास प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
          दरम्यान, या प्रकरणी सुनील कोकरे व दादा भाळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही व तपास वालचंदनगर पोलिसांकडून सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment