फेलोशीपद्वारे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्याला सलाम : खा.सुप्रिया सुळेंची घोषणा. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

फेलोशीपद्वारे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्याला सलाम : खा.सुप्रिया सुळेंची घोषणा.

फेलोशीपद्वारे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्याला सलाम : खा.सुप्रिया सुळेंची घोषणा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपची घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा १२ डिसेंबर रोजी येणारा वाढदिवस यावर्षीपासून अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार असून त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणाऱ्या होतकरु तरुण तरुणींना तर शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या सहाय्याने काम करणाऱ्या शिक्षकांना ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ दिल्या जाणार आहेत. याची घोषणा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. 
यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, की  “आदरणीय पवार साहेब गेली साठ वर्षांहून अधिक काळ देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहेत. शेती क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आजही जनतेला फायदा होत आहे. याशिवाय औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण, शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण इ. इ. अशा विविध क्षेत्रांमध्ये पवार साहेबांनी केलेले कार्य क्रांतिकारी असून पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.” 
पवार साहेबांनी आपल्या प्रदिर्घ कारकिर्दीत स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी घालून दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सुत्राचा वसा कायम ठेवला. पवार साहेबांच्या नावाने फेलोशीप जाहिर करताना आनंद होत असून याचा विकासाची जाण असणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची धमक असणाऱ्या तरुण-तरुणींना नक्कीच फायदा होईल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’, ‘शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप’ (शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती) आणि ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’ या तीन फेलोशीप दिल्या जाणार आहेत. यापैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील फेलोशीपचा कार्यक्रम दि. ८ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार असून निवडलेल्या फेलोंची घोषणा दि. १ डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवशी निवडलेल्या फेलोंना ती फेलोशीप सन्मानपूर्वक प्रदान केली जाणार आहे.”  
शेती क्षेत्रासाठी फेलोशीपसाठी महाराष्ट्रातील जिज्ञासू, विषयातील रुची आणि परिणामकारक नेतृत्त्वगुण या निकषांवर या तरुण-तरुणींची तज्ज्ञांच्या कमिटीद्वारे निवड करण्यात येईल. यासाठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यातून शॉर्टलिस्ट केलेल्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. त्यानंतर तज्ज्ञांची कमिटी त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील ८० जणांची फेलोशीपसाठी निवड केली जाणार आहे.या फेलोंना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ व अभ्यासक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. साहित्य क्षेत्रातील नव्या प्रवाहांमध्ये दमदार लेखन करणाऱ्या प्रयोगशील लेखक-लेखिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून शॉर्टलिस्ट झालेल्या तरुण-तरुणींच्या मुलाखती घेऊन त्यातून दहा जणांना ही फेलोशीप जाहिर करण्यात येणार आहे. या फेलोंना साहित्य निर्मितीसाठी नामवंत साहित्यिक मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी मदत देखील करण्यात येणार आहे. 
दरम्यान शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांसाठी 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन' चा कार्यक्रम डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या प्रयोगशील तरुणाईसाठी ही एक संधी असून या फेलोशीपसाठी जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी अर्ज सादर करावेत असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 
MKCL  फौंडेशन, बारामती ॲग्रीकल्चर  डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे फेलोशिप उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य  लाभले आहे .शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’चे मुख्य समन्वयक विवेक सावंत असतील .
याप्रसंगी फेलोशिपच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे  विश्वस्त श्री बी. के. अग्रवाल ,‘शरद पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप’चे मुख्य समन्वयक प्रा.नितीन रिंढे,आदी उपस्थित होते.‘ त्याचबरोबर शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’चे मुख्य समन्वयक डॉ.निलेश नलावडे, हे झूमद्वारे  उपस्थित होते.‘ 
फेलोशीपची २०२१-२२ ची रूपरेषा खालीलप्रमाणे 
•    अर्ज मागविण्याची तारीख  :८ ऑक्टोबर २०२१ 
•    अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख  : १५ नोव्हेंबर २०२१
•    अर्जांची छाननी करण्याची तारीख : १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर 
•    निवडीची घोषणा  : १ डिसेंबर २०२१
•    फेलोशीपची सुरुवात : १२ डिसेंबर २०२१ पासून 
अर्ज www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर उपलब्ध

No comments:

Post a Comment