*वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*
पुणे, दि. ११: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत २५ टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि १ लाख थेट कर्ज योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना या राष्ट्रीयकृत बँका, राज्यस्तरीय बँकर्स समिती सदस्य असलेल्या बँकांसह इतर सहकारी बँका, नागरी बँका, सर्व शेड्युल व मल्टीशेड्युल बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून २५ टक्के बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. बँकांचा सहभाग ७५ टक्के असून व्याजदर बँकाच्या नियमाप्रमाणे लागू राहील. महामंडळाचा सहभाग २५ टक्के रकमेवर व्याजदर ४ टक्के आहे. या योजनेत महत्तम प्रकल्प मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंतची आहे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रमांसाठी, लघू, मध्यम उद्योगांचे उत्पादन व विक्रीसाठी व सेवा क्षेत्रांसाठी कर्ज वितरित करण्यात येते. महत्तम कर्ज मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे कर्ज खात्याची आधार जोडणी असणे अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता कर्जाची मर्यादा १० लाख ते ५० लाख रुपयापर्यंत असून या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत. गटातील सदस्याचे वय १८ ते ४५ वर्ष पर्यंत असावे. गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील प्रमुख सदस्याने महामंडळाच्या महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. गटातील सर्व लाभार्त्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरकरिता असलेल्या कौटुंबिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत असावे.
१ लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज योजनेमध्ये महामंडळाकडून १ लाख रूपयाचे थेट कर्ज दिले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे. लाभार्थ्यांना कोणताही हिस्सा भरावा लागणार नाही. नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल २ हजार ८५ रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यांवर दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.
जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 'बी' विंग, तळमजला, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, येरवडा पुणे, दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०४९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment