वृत्तपत्र माध्यमातील नव्या परंपरांचे प्रणेते : वसंत मुंडे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 27, 2021

वृत्तपत्र माध्यमातील नव्या परंपरांचे प्रणेते : वसंत मुंडे

वृत्तपत्र माध्यमातील नव्या परंपरांचे प्रणेते : वसंत मुंडे

औरंगाबाद:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथे दि. 28 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी आणि काम करणार्‍या पत्रकारापासून कर्मचार्‍यांपर्यंत स्थैर्य मिळावे यासाठी नव्या परंपरा पुढे आणल्या आहेत. वृत्तपत्र आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर झाल्यानंतरच दर्जा राखला जाईल आणि सामान्य माणसाचा आवाज अधिक बुलंद होईल. यासाठी वृत्तपत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच जाहीरपणे भूमिका मांडली असुन त्यांच्या भूमिकेचे छोट्या वृत्तपत्रांनी स्वागत केले आहे. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख.

पत्रकारिता म्हणजे अतिसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम. हेच समजून घेत वसंत मुंडे नावाचा एक सामान्य तरुण पत्रकारितेत आला आणि सामान्यांचे प्रश्न मांडता मांडता पत्रकारिता करणार्‍यांचेदेखील प्रश्न मांडू लागला. वाचून आश्‍चर्य वाटेल, पण वसंत मुंडे यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षांपासूनच भ्रष्टाचारासारख्या गंभीर मुद्याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. विद्यार्थीदशेत असताना गावालगत रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरणाचं काम चालू होतं. मजुरांच्या संघटनांच्या मागणीवरून मजुरीत वाढ झाली. पण मजुरांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत कागदावर जास्त रक्कम लिहून मजुरांच्या हातात कमी रक्कम दिली गेली. हा सर्व भ्रष्टाचार शालेय वयात असलेल्या वसंत मुंडेंच्या लक्षात आला. त्यांनी हा सगळा प्रकार तेव्हाचे अंबाजोगाई तील  लोकमतचे पत्रकार मोटेगावकर सरांच्या कानावर घातला आणि मजुरांना न्याय मिळवून दिला. 
ही गोष्ट बघून वसंत मुंडे यांनी ठरवलं, आता आपणही अशाच प्रकारे काम करून सामान्यांना न्याय मिळवून द्यायचा. हा विचार डोक्यात येणं म्हणजेच एक प्रकारे पत्रकारितेची सुरुवात झाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पुढे पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालय शिकत असतानाच दैनिक लोकपत्र, दैनिक मराठवाडा साथी चे बातमीदार म्हणून काम केले. दरम्यान अंबाजोगाई जिल्हा निर्मीती आंदोलनातील  घटने नंतर त्यांच्या जिवणालाच कलाटणी मिळाली.
बीड येथे काही काळ लोकपत्र काम केल्यानंतर त्यांची   लोकसत्ता या वृत्तपत्रात बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि वीस वर्षांपासून ते कार्यरत आहेत. लेखणीतून वंचित, उपेक्षित वर्गासाठी काम करणार्‍या अनेक संस्थांना आर्थिक मदत उभी करून दिली. तर शेती, शिक्षण या विषयावर सकारात्मक व ऊर्जा निर्माण करणारे विपुल लिखाण केले. त्यातुनच तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ग्रामीण भागातील विकास कामांच्या अंमलबजावणीचा कायदा या विषयावरील देशातील निवड पन्नास पत्रकारांच्या राष्ट्रीय  परिषदेत वसंत मुंडे यांची निवड झाली.त्यावेळी मुंडे यांनी सुचवलेल्या वीज बचतीचे  उपायांचे पंतप्रधानांनी कैतुक केले होते.ऊतोडणी मजुरांबरोबर राहुन केलेल्या लेख मालिकेला समर्थ ने शिष्यवृत्ती दिली तर अनेक पुरस्कारही मिळाले. उत्तम संवाद व बिनधास्त पणे मोजक्या शब्दात विषय मांडण्याची हातोटी हे त्यांचे वैशिष्ट्य.
लेखणीतून सामान्यांचे प्रश्न मांडता मांडता त्यांना आपल्या सहकारी पत्रकारांच्या प्रश्नांचीदेखील जाणीव झाली. पत्रकार आपल्या लेखणीतून नेहमीच जनतेचे प्रश्न मांडतात. पण त्यांच्याच प्रश्नांकडे बर्‍याचदा डोळेझाक होते. त्यावर कोणी बोलत नाही. राज्यकर्ते आणि समाजालाही पत्रकारांना काही प्रश्न असतील असे वाटत नाही. हे जाणवल्यानंतर मुंडे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून वार्ताहर आणि संपादकांचे प्रश्न मांडून सोडवण्यासाठी मार्गही सांगितले. औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मुंडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच पत्रकार आणि शासकीय समितीची प्रत्येक जिल्ह्यात ”खुली चर्चा” नावाचा उपक्रम राबवला. त्यातून पत्रकारांच्या सूचना समितीसमोर आल्या. त्यातूनच जाचक अटी शिथिल करून अधिस्वीकृती मिळण्याचा मार्ग सोपा केला. शहरापासून ते अगदी तळागाळातील पत्रकारांचे प्रश्न मांडले जाऊन त्यावर उपाययोजना होऊ लागल्या. याची दखल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील घेतली होती. 
मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मुंडे सरांची बिनविरोध निवड झाली. पत्रकार संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच संपादक नसताना वसंत मुंडे यांची राज्य अध्यक्षपदी निवड झाली. गावखेड्यापासून ते शहरापर्यंत अशा तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त पत्रकार सदस्य असलेल्या संघटनेचे कामकाज अधिक लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी विविध पद्धतीने प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसला. जाहिरातीचा ओघ एकदम कमी झाल्याने छोट्यांसह मोठ्या वृत्तपत्रांचेही आर्थिक गणित बिघडले. स्वस्तात घरपोच वृत्तपत्र देण्याचे पारंपरिक धोरण त्यात करोना व ऑनलाइनची सवय यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. कर्मचार्‍यांची कपात झाल्याने बेकारीची कुर्हाडच कोसळली. या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी वृत्तपत्रांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्गच दाखवला. मुंडे यांनी संपादकांची पहिली गोलमेज परिषद घेतली आणि वृत्तपत्रांनी आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी अंकाची विक्री किंमत वाढवण्याचे आवाहन केले. वृतपत्र वितरक ते मालक, संपादक यांना विविध माध्यमांमधून किंमत वाढवण्याची जागृती केली. वृत्तपत्रांच्या आर्थिक धोरणावर  मुलाखतींमधून परखड भूमिका मांडली. लोकपत्रकार भागवत तावरे यांनी शब्दबद्ध केलेली वसंत मुंडे यांची मुलाखत राज्यातील तब्बल तीनशेपेक्षा अधिक वृत्तपत्रांनी प्रकाशीत करून समर्थन दिले. परिणामी वर्षभरात राज्यातील तब्बल 185 दैनिकांनी  किंमत वाढवली व त्यांना वाचकांनीदेखील योग्य प्रतिसाद दिला. एका पत्रकाराची एकच मुलाखत राज्यातील विविध दैनिकांत प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे मुंडेंचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे.

वृत्तपत्र व्यवसायाला ऊर्जीत करण्यासाठी केंद्र सरकारने करदात्यांना वृत्तपत्र खरेदीवर उत्पन्न करात वार्षिक पाच हजारांची सवलत द्यावी, अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली असून सकारात्मक विचाराधीन आहे. पूर्वी माहितीची इतर माध्यम नसल्याने वृत्तपत्र नियमित काढण्याचेही धोरण रूढ झाले. परिणामी  पत्रकार सतत घडणार्‍या बातम्यांचा वेध घेत असतात. त्यासाठी ते सदैव तत्पर असतात. बर्‍याचदा तर वेळी-अवेळीदेखील त्यांना रिपोर्टिंग कराव लागतं. मात्र पत्रकारांनाही कुटुंब असतं, त्यांनादेखील भावना असतात याचा विचार होत नाही. सरकारनेही आता पाच दिवसांचाच आठवडा केला आहे. खासगी उद्योगांतही रविवारी सुटी असतेच. त्यामुळे  वृत्तपत्रांनीही रविवारी पूर्ण सुटी घेतली तर कर्मचारी नव्या ऊर्जेने काम करतील. मुंडे यांच्या आवाहनानंतर काही वृत्तपत्रांनी सुटीचा निर्णय घेतला असून चांगला परिणाम दिसून आला.

त्याचबरोबर सध्याच्या काळात तरुण पिढी न्यूज पोर्टल, वेबसाइट, यूट्युबच्या माध्यमातून पत्रकारिता करतात. नव्या पिढीतील पत्रकार रोजगाराच्या नव्या वाटा शोधत आहेत. आणि त्यात यशही मिळवत आहेत. हे माध्यमही सरकारने अधिकृत करावे यासाठी लढा चालू आहे. या सर्वांना सरांमुळे योग्य मार्गदर्शन व पाठबळ मिळत आहे. सद्यस्थितीत वृत्तपत्र व्यवसायाला पाठबळ मिळावे आणि पत्रकारांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर केंद्रीय स्तरापर्यंत जाऊन प्रयत्न करत आहेत. 

वर्षानुवर्ष सरकारकडे मागण्या करुन काय साध्य झाले? याचा विचार करुन माध्यमातील लोकांनीच सक्षम झाले पाहिजे अशी भूमिका केवळ मांडली नाही तर पत्रकार संघाच्या माध्यमातून नवीन पायंडे सुरू केले. सहकारी मीत्र संतोष मानुरकर यांच्या साथीने,बीड येथे स.मा.गर्गे भवनाची निर्मिती केली. पंधरा वर्षोत, गर्गे यांच्या नावाने राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराला प्रतिष्ठा मिळवून दिली. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची हजेरी व जुगलबंदीने या कार्यक्रमाला उंची मिळाली. 
औरंगाबाद विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष म्हणून खुली चर्चाबरोबरच ज्येष्ठ पत्रकारांना घरी जाऊन सन्मानाने अधिस्वीकृती पत्रिका देण्याचा उपक्रम राबवला. तर ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी आणि पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी यशस्वी लढा दिला. करोना काळात 28 जिल्ह्यातील पत्रकारांशी वेब संवाद केला. तर पदाधिकार्‍यांमार्फत लोकसहभागातून पत्रकारांना किराणा साहित्यासह मदत मिळवून दिली. पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या. तर एकाच दिवशी राज्यभर ‘रक्तदान’ शिबीर घेऊन चौदाशे बॅग रक्त संकलन करुन देण्याचा विक्रम नोंदवला. समाज माध्यमाच्या मोहजालातही संवाद कायम रहावा यासाठी औरंगाबाद विभागीय कार्यालयात वार्तालाप तर बीड येथे मासिक व्याख्यानमाला सुरू केली. परिणामी राज्यभरात संघाच्या माध्यमातून वार्तालाप घेतले जात आहेत. दिवाळीत राज्यभर पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक पातळीवर स्नेहमिलन घेऊन संघाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना लोकसहभागातून मदत उपलब्ध करुन देण्याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठीही संघाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. अशा नवीन उपक्रमातून संघटना आणि वृत्तपत्र क्षेत्रात नव्या परंपरा पुढे करत या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी त्यांनी भूमिका घेतल्याने मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र क्षेत्रात एक आश्‍वासक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. 

-प्रा. डॉ. प्रभू गोरे, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment