स्वर्गाच्या दाराला स्पर्श करून आलेली स्त्री! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 6, 2022

स्वर्गाच्या दाराला स्पर्श करून आलेली स्त्री!

*स्वर्गाच्या दाराला स्पर्श करून आलेली स्त्री!*

पुणे(प्रतिनिधी):- मीनल वय अंदाजे सत्तावीस - अठ्ठावीस. शिक्षण बीकॉम पर्यंत. आकर्षक चेहरा, सुंदर कमनीय बांधा. मराठी सिनेमात हिरॉईन वाटावी अगदी तशी मोहक. गोड आवाज, पाणीदार डोळे. बोलण्यात आत्मविश्वास भाषा स्वच्छ. एकंदरीत धाडसी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मीनलने घरच्यांशी विरोधात जाऊन अविचलशी केलेल्या प्रेमविवाहाने त्यांना जगण्यासाठी माळशिरसहुन पुण्याचा रस्ता दाखविला होता. मांजरी - शेवाळवाडी भागात नवविवाहित जोडी स्थिर झाली.
       मिनलने घराजवळच चार पाच किमी अंतरावरील शाळेत जॉब बघितला होता. नवऱ्याची कमाई आता बरी होती. देखणा, उंचापुरा, गोरापान असणारा अविचल आता रियल इस्टेट व्यावसायात जम बसवू पाहत होता. महिन्यात दोन तीन घरे भाड्याने बघून दिली तरी वीस पंचवीस हजार रुपये मिळत होते. एकंदरीत दिवस आनंदात चालले होते. 
        दरम्यान २०२० साल उजाडलं तेच मुळात कोविडच्या बातम्या घेऊन. जानेवारी - फेब्रुवारीतच वातावरण गंभीर होऊ लागलं. सरकारी आदेशाने मार्च महिन्यात सगळं बंद झालं! तशी कमाई सुध्दा बंद झाली. दोघांनी कष्टाने साठवलेले साठ सत्तर हजार रुपये संपत आले. मार्च-एप्रिल- मे तीन महिन्यांत फ्लॅटचे हप्ते जात होते, मात्र फ्लॅटचा ताबा मिळाला नव्हता. म्हणून जिथे राहत होते तेथील राहत्या घराचे घरभाडेही द्यावे लागतच होते. जून महिन्यात बाहेर पडून पुन्हा काम शोधणे गरजेचे आहे. असे तिला वाटू लागले. नवे घर - नवी जागा शोधायला कोणीच येत नव्हतं. रियल इस्टेटचा व्यवसाय भाडेकरू येईनात म्हणून मंदीतच नव्हे तर मोडीत निघालेला. एक रुपयाची सुद्धा आवक नाही म्हणून अविचल निशब्द आणि स्तब्धच असे. 
         जुनी नोकरी असलेली शाळा लॉकडाऊन मुळे बंद असल्याने नोकरी गमावलेली. शाळेचा विषय सोडून देऊन घरापासून जवळच पाच सात किमी अंतरावर मिनलने पुन्हा नवी नोकरी बघितली. महिना साडेसहा हजार रुपये पगार! काहीच नसण्यापेक्षा संसारात हातभार म्हणून साडेसहा हजार तरी काय वाईट ? म्हणून नवी नोकरी इमाने इतबारे सुरू झाली. कामाला जाऊन पंधराच दिवसच झाले असतील तर अविचलला सोलापूर रस्त्यावरुन एका हॉस्पिटलमधून फोन आला. अविचलने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मीनलचा बेशुद्ध पण जिवंत देह पुणे स्टेशन जवळच्या एका धर्मादाय रुग्णालयात आणला. अर्ध्या तासाच्या अंबुलन्स प्रवासात कॉलेज पासून लग्नापर्यंतची सगळी दृश्ये त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून गोल फिरत होती. 
       हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच त्याला पन्नास हजार भरायला सांगितले. अविचलची परिस्थिती ओळखून त्याचा मित्र सिद्धार्थ जाधवने क्रेडिट कार्ड वापरून पन्नास हजार भरले. डोक्याला मार लागून रक्तस्राव आणि हात तीन ठिकाणी मोडल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्येच उपचार करावे लागतील म्हणून सोलापूर रस्त्यावरील दवाखान्यातुन पुणे स्टेशन जवळ तिला आणि डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे आणलं होतं. 
       वेगवेगळ्या तपासण्या पार पडल्यानंतर संध्याकाळी चार वाजता तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती हॉस्पिटलने त्याला दिली. तिच्या जीवाला धोका नाही. ती बरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्याला गलबलून आलं डोळे पाणावले. मात्र पुढचे १५ दिवस ऍडमिट करून होणाऱ्या उपचारासाठी सात लाख रुपयांचे अंदाजपत्रक त्याच्या हाती देण्यात आले. शिवाय आता एक लाख भरा, म्हणजे पुढची ट्रिटमेंट करता येईल अन्यथा ससूनला हलवा. असे सांगायला ते विसरले नाहीत. 
     साता वरचे शून्य पुन्हा पुन्हा मोजून, ओठातल्या ओठात पुटपुटत सात हजार तरी बँकेत असतील का? असे स्वतःलाच म्हणाला. सात लाख लागणार आहेत. पंधरा दिवसात सात लाख रुपये आणि उद्या सकाळ पर्यंत तरी एक लाख आणायचे कुठून? या विचाराने श्वास त्याचा जड झाला. घरातून लग्नाला विरोध त्यामुळे दोघांच्या घरून मदतीची अपेक्षा करणे ही महा 'चूकच' ठरणार होती. 
         नारायण पेठेतील रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यालयात सिद्धार्थ जाधवने त्याचा मित्र अविचलची 'मिनलमय' लोभस प्रेमकथा ऐकवली.  तगडा खांबासारखा अविचल सैरभैर आणि सतत शर्टाच्या बाहिने डोळे पुसत होता. काही तरी करा पण तिला वाचवा म्हणत होता. 
       मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये माहिती घेतली. त्याची सगळी कागदपत्रे तपासली. तत्कालीन धर्मादाय सह आयुक्त श्री. नवनाथ जगताप यांच्याशी बोललो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि नव्याने हद्दीत समाविष्ट गाव म्हणून पुणे मनपाचा निधीही मिळवून दिला. निधीच्या माध्यमातून पाच लाख रुपये हॉस्पिटलला मिळाल. मिनलचं सगळं 'बिल माफ' झालं. त्याला अगदी स्वप्नवत वाटलं.  सात लाख रुपये आणायचे कुठून? असा विचार करणारा अविचल आता गलितगात्र अवस्थेतून बाहेर आला होता. त्याची चिंतेत असणारी भिरभिरती नजर स्थिर झाली होती. परिस्थितीने लादलेली लाचारी आणि पैसे नाहीत म्हणून गमावलेला आत्मविश्वास त्याने पुन्हा कमावला होता. सर तुमच्यासाठी काय बोलू कळत नाही, फार उपकार झाले. असं वारंवार बोलू लागला.
        रुग्णांचे हक्क आणि अधिकार आम्ही त्याला समजावून सांगितले. त्याला त्याचा उपचार मिळविण्याचा हक्क मिळाला होता. म्हणूनच मिनलला दर्जेदार उपचार मिळाले होते. समस्त नागरिकांच्या आरोग्य आणि हक्कांच्या जागृती साठी आपल्याला लढायचे आहे. रुग्णांच्या हक्काचे संरक्षण करणारा- रुग्णांच्या हक्काचा कायदा झाला पाहिजे, म्हणून निर्माण केलेल्या रूग्ण परिषदेच्या चळवळीने राज्यात एक बळकट स्थान निर्माण केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कायदा केलाच पाहिजे म्हणून लढा लढत असतानाच मीनल सारख्या अनेक माणसांना 'जीवदान' दिले आहे. कधीही जात धर्म न बघता जात भारतीय आणि धर्म माणुसकी! हेच ब्रीद अवलंबले. 
      मीनलला मी एकदाही भेटलो नव्हतो. सहा महिन्यांनंतर अविचल पुन्हा भेटला ते पुण्यात टिळक रोडला. बँक ऑफ इंडिया मध्ये. एक सुंदर युवती मला त्याच्या सोबत दिसली. होय ती मीनलच. ''सर हे बघा मीनल बरी झाली. तुम्ही मदत केली म्हणून वाचली. नाही तर पैसे नव्हते तर मला घरीच आणावी लागली असती. आज माझ्या सोबत नसती.'' असे म्हणून भर गर्दीत पाया पडायला वाकला तसा मी खांदे धरून उठवला. परत कधीच कुणाच्याच पाया पडू नको असेही सांगितले. मीनलचे पोट बाहेर दिसत होते. तिने आत्मविश्वासाने ॲक्टिवा बाहेर काढली. पाठीमागे नवऱ्याला बसायला सांगितले. ती गाडीवर बसल्यावर मी नकळतपणे फोटो घेतला. कितीही संकटे आली तरी हतबल व्हायचं नाही, ताकद गमावलेल्या लोकांना पुन्हा ताकदीने उभे करायचं! म्हणून सुरू केलेला हा रुग्ण हक्क परिषदेचा अट्टाहास पुन्हा एक यशाचा अनुभव समोर देऊन गेला. मीनल स्वर्गाच्या दाराला स्पर्श करून आलेली स्त्री! पुन्हा मातृत्वाच्या परीक्षेसाठी तयार झाली होती!

     ( सत्य घटनेवर आधारित असलेल्या कथेतील पात्रांची नावे बदलली आहेत.)

     लेखन:-   © उमेश चव्हाण, १३६, नारायण पेठ, पुणे मो. ८८०६०६६०६१

No comments:

Post a Comment