तीनशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखा तून सुप्याच्या मंदिर निर्मितीला उजाळा. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 13, 2026

तीनशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखा तून सुप्याच्या मंदिर निर्मितीला उजाळा.

तीनशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखा तून सुप्याच्या मंदिर निर्मितीला उजाळा.
महाशिवरात्रीला बांधला होतो सभामंडप

सुपे:- सुपे परगण्यास महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्व आहे.भोसले घराण्याला मिळालेली जहागीर ते पेशवे काळापर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडीचे  सुपे महत्वाचे केंद्र आहे. याच सुप्यातील सिद्धेश्वर मंदिर बांधकाम व सभामंडपाचे बांधकाम यांचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख भीमथडी इतिहास संशोधन संस्थेच्या अनिल दुधाने यांच्यामुळे  उजेडात आले आहेत.

सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गाभारा प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस भिंतीवर कोरलेला आहे .सदर शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ७ ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे.


शिलालेखाचे वाचन :

१.श्री 
२. शके १६४२ शार्व
३. री संवत्सरे दा 
४.माजी माणकेश्व 
५.र देशपांडिये 
६.प्रा. सुपे त्यांणी हे  
७.हे देवूळ बांधले

अर्थ.श्री गणेशाला नमन करून शालिवाहन शके १६४२व्या वर्षी शार्वरी  नाम सवंतसरात म्हणजेच १९ ऑगस्ट १७२० या दिवशी मौजे सुपे परगणा येथील दामाजी माणकेश्वर देशपांडे यानी  श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर(देवूळ ) बांधले .
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख.शके १६४२- इ.स.१७२० (साधारणतःफेब्रुवारी १७२० मार्च१७२१)दरम्यान कोरलेला आहे .लेखात “देशपांडे” ही उपाधी असे  दर्शवते की दामाजी माणकेश्वर हे सुपे क्षेत्र परगण्याचे महसुली अधिकारी किंवा लेखाधिकारी वर्गातील होते.त्यामुळे हा शिलालेख स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्या कडून केलेल्या देवालय-निर्मितीचा पुरावा मानता येतो..म्हणजेच स्थानिक प्रशासनातील उच्चवर्गीय व्यक्तींनी धार्मिक संस्थांना आश्रय दिल्याचे दिसते. तसेच शिलालेख शिवमंदिरात असल्याने शैव परंपरेचे स्थानिक बळकटीकरण दिसते  व स्थानिक स्तरावर १८व्या शतकात मंदिरविकास सुरू असल्याचा हि पुरावा मिळतो.त्यामुळे हा शिलालेख मराठा सत्तेच्या प्रारंभीच्या (छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील) धार्मिक स्थापत्याचा मोठा  पुरावा ठरतो.यावरून मराठा काळातील धर्म संरक्षण व दान परंपरा स्पष्ट होते.हा शिलालेख केवळ मंदिरबांधणीची नोंद नसून तो मराठाकालीन प्रशासन, दानसंस्कृती, धार्मिक जीवन आणि स्थापत्यविकास यांचा एकत्रित पुरावा आहे. हे या शिलालेखाचे विशेष महत्व आहे.

सुपे येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर सभामंडप  प्रवेशद्वार शिलालेख   


उपलब्धी व स्थळ :- हा शिलालेख  सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वर मध्यभागी कोरला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून चार ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे.

शिलालेखाचे वाचन :

१.श्री तीथेन  युग्मे सप्त रस चंद्र सुपे क्षेत्रि 
२.तपसि बहूळ पक्षे द्वादशी चंद्रावारो 
३.रचेयती सिवभक्त मांणको सुत दामा 
४.जी सभामंडप निर्मियेला [शुभ भवतु??].  


अर्थ.श्री गणेशाला नमन करून शालिवाहन शकाच्या १६७२ व्या वर्षी  प्रमोद नाम संवत्सरात तपसि  (माघ) महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी,चंद्र्वारो या दिवशी, म्हणजेच ११फेब्रुवारी १७५१ सोमवार महाशिवरात्री च्या आदल्या दिवशी सुपे क्षेत्रातील शिवभक्त माणकेश्वर याचा पुत्र दामाजी (देशपांडे)याने हा सभामंडप बांधला.शुभ होवो.
शिलालेखाचे महत्व :- या शिलालेखात  वर्ष उल्लेख शशांक पद्धतीने केला आहे युग्मे सप्त रस चंद्र असा शब्दात अंक लिहिले (१६७२ )आहेत तसेच हा लेख तिथी, वार, संवत्सर आणि वर्ष  यांची सांगड घालणारा अचूक अभिलेख आहे. लेखात आलेले देशपांडे” उल्लेखामुळे दामाजी माणकेश्वर हे स्थानिक महसुली,प्रशासकीय प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे सूचित होते.त्यांनी शके १६४२ साली मूळ मंदिर बांधलेले आहे . पुढे काही वर्षांनंतर शके  १६७२ साली  त्याच मंदिराचा सभामंडप बांधला आहे .मूळ देवालयानंतर सभामंडपाची उभारणी. हे मंदिरविस्ताराचा महत्वाचा पुरावा मिळतो यावरून देशपांडे घराण्याची धार्मिक आश्रयदात्याची भूमिका स्पष्ट होते. शैव परंपरेतील अत्यंत पवित्र महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी केलेली बांधणी ही धार्मिक हेतू या अभिलेखातून अधोरेखित करते.  हे या शिलालेखाचे विशेष महत्व आहे.
   दोन्ही शिलालेखांचे वाचन भीमथडी इतिहास संशोधन संस्थेच्या श्री अनिल दुधाने यांनी केले असून विश्वास देशपांडे यांचे सहकार्य लाभले आहे.
   भीमथडी इतिहास संशोधन संस्थेच्या माध्यमातून बारामती परिसरातील अनेक शिलालेखांचे संशोधन व वाचन होत असल्याने स्थानिक इतिहास उजेडात येत असल्याची माहिती  भीमथडी इतिहास संशोधन संस्थेचे अध्यक्ष विनोद खटके व सचिव मनोज कुंभार यांनी दिली.

No comments:

Post a Comment