इंदापूर तालुक्यातील कुंभारवळणला पक्षी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - खासदार सुप्रिया सुळे यांचे आश्वासन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 12, 2022

इंदापूर तालुक्यातील कुंभारवळणला पक्षी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - खासदार सुप्रिया सुळे यांचे आश्वासन*

*इंदापूर तालुक्यातील कुंभारवळणला पक्षी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - खासदार सुप्रिया सुळे यांचे आश्वासन*
भिगवण, दि. १२ (प्रतिनिधी) - सकाळची कोवळी किरणे... हिरवागार निसर्ग... पाण्यावर संथ लयीत पुढे सरकणारी बोट आणि आजूबाजूला भरलेले रंगीबेरंगी पक्षांचे संमेलन. मधूनच दुडक्या चालीवर नाचणारे आणि एकमेकांना चोचीने चुचकरणारे परदेशी पाहुणे... फ्लेमिंगो! हे दृश्य आहे, उजनी जलाशयाच्या काठचे. पुण्याहून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळ असलेल्या या ठिकाणाचे नाव आहे कुंभारवळण...!! हजारो किलोमीटर अंतर कापत इथवर आलेल्या या पक्षांचे संमेलनस्थळ पर्यटनाचे केंद्र व्हावे यासाठी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे.  जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि इंदापुरचे आमदार तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत चर्चा करून कुंभारवळण येथे पक्षी पर्यटन वाढवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा वाढवण्यात येतील, असे आश्वासन सुळे यांनी आज दिले. 

सुळे यांनी आज सकाळी सहकुटुंब याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, कुंभारवळणच्या सरपंच उज्वला परदेशी, राज्य मच्छी मार संघटना कृती समितीचे उपाध्यक्ष सिताराम नगरे, विठ्ठल भोई, युवासेनेचे समन्वयक नवनाथ सुतार , महेंद्र सवाणे, राजाभाऊ शिंदे आदी याप्रसंगी उपस्थीत होते. 
उजनीच्या जलाशयात कुंभारवळण गावापासून जवळच हजारो किलोमीटरचा प्रवास करत सायबेरियातून फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी येतात. तब्बल चार ते सहा फूट इतके उंच असणारे हे पक्षी तीनशे ते चारशेच्या संख्येने येथे येत असतात. दरवर्षी साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आलेले हे पक्षी एप्रिल-मे पर्यंत येथेच राहतात. या फ्लेमिंगो बरोबरच चित्रबलाक, पाणघार, आणि अन्य अनेक प्रकारचे स्थानिक रंगीबेरंगी पक्षांचे या दिवसांत येथे जणू संमेलनच भरलेले असते. 
पक्षांचे हे अनोखे संमेलन पाहणे हा एक अत्यंत आल्हाददायक आणि मनाला उभारी देणारा अनुभव असतो. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र आणि देशभरतूनच नाही, तर जगभरातून पक्षीप्रेमी आणि अभ्यासक  कुंभारवळणला भेट देतात. पर्यटकांची संख्या आणखी वाढावी आणि स्थानिक गावकऱ्यांना त्यातून रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले. सध्या येथे तीस ते चाळीस बोटी आहेत. त्याद्वारे पर्यटकांना पक्षीदर्शन घडवून आणले जाते. पर्यटनासाठीच्या तांत्रिक विषयांबाबत असलेल्या शासकीय स्तरावरील अडचणी दूर करण्यासाठी  लवकरात लवकर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment