पोलिसांची मोठी कारवाई, बारामतीच्या गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी, एमपीडीए(MPDA) कायद्यांतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 8, 2026

पोलिसांची मोठी कारवाई, बारामतीच्या गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी, एमपीडीए(MPDA) कायद्यांतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध...

पोलिसांची मोठी कारवाई, बारामतीच्या गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी, एमपीडीए(MPDA) कायद्यांतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध...
बारामती प्रतिनिधी (रामायण धर्माधिकारी):-गुन्हेगाराची आत्ता काही खैर नाही, बारामती व तालुक्यातील अट्टल गुन्हेगार यांची उचल बांगडी होत असून रडारवर असणाऱ्या गुन्हेगार यांच्या वर कारवाई करण्यात येत असून नुकताच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत
कठोर कारवाई केली आहे.तांदुळवाडी येथील सुरेंद्र रवींद्र काजळे याला जिल्हाधिकाऱ्यांच्या
आदेशानुसार पुढील एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बारामती परिसरातील गुन्हेगार टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र
काजळे याच्यावर पुणे ग्रामीणसह बारामती परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, गंभीर दुखापत, विनयभंग, फसवणूक आणि मारहाण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या
गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. समाजात दहशत पसरवणाऱ्या अशा
विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी बारामती पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 'महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी,धोकादायक व्यक्ती विघातक कृत्ये प्रतिबंधक अधिनियम 1981 '
(MPDA) अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण)यांच्यामार्फत हा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात
आला होता. सर्व तांत्रिक बाबी आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीला एक वर्षासाठी
स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.आदेश मिळताच बारामती पोलिसांनी तात्काळ अंमलबजावणी करत आरोपीची रवानगी थेट नागपूर मध्यवर्ती
करण्यात आली,ही यशस्वी कारवाई पोलीस
अधीक्षक संदीपसिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी
सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस अंमलदार महेश बनकर, सागर देशमाने आणि विकास खाडे यांचा समावेश होता.

कायद्याचा धाक निर्माण करणे हेच आमचे उद्दिष्ट - संदीपसिंह गिल, पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण)..
“जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देत आहोत. 2025-26 या कालावधीत आतापर्यंत 16 गुंडांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध केले आहे.
गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांना हा स्पष्ट इशारा असून, ही मोहीम अशीच सुरु राहील."


दहशत निर्माण करणाऱ्यांना सूट नाही- गणेश बिरादार,अपर पोलीस अधीक्षक...                 "बारामती विभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल ठाम आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष असून, समाजात दहशत पसरवणाऱ्यांवर एमपीडीएसारख्या कठोर कायद्यांखाली थेट कारवाई केली जाईल."

नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड
नाही-सुदर्शन राठोड, उपविभागीय
पोलीस अधिकारी..
"बारामती उपविभागात शांतता
आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी
प्रशासन कटिबद्ध आहे. सराईत
गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईचा
बडगा यापुढेही उगारला जाईल."

No comments:

Post a Comment