अमरावती :-तक्रारकर्त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांदगावखंडेश्वर येथील नायब तहसीलदार सुनील सखाराम राठोड (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १२) अटक केली.तक्रारकत्याने शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा, यासाठी नांदगावखंडेश्वर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. २४ जुलै २०२६ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी ते कार्यालयात गेले असता, नायब तहसीलदार राठोड यांनी त्यांच्या बाजूने तातडीने निकाल देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर ३० हजार रुपयांवर तडजोड झाली.
त्यापैकी निकालापूर्वी २० हजार आणि निकालानंतर १० हजार रुपये देण्याचे
ठरले होते.या प्रकरणी तक्रारकत्याने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची पडताळणी करून सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला. या वेळी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राठोड यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध नांदगावखंडेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत
पोलिस उपअधीक्षक रमेश ताले हे सापळा अधिकारी, तर उपअधीक्षक राजेश राठोड हे पर्यवेक्षण अधिकारी होते. पोलिस निरीक्षक संजय शिंदे, वैभव जायले,राजेश मेटकर आणि उपनिरीक्षक सतीश किटुकले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment