परिसरातील सहा युवकांना पोलीस भरतीत यश.विद्याधाम विद्यालयातील अभ्यासिकेचा झाला लाभ.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

परिसरातील सहा युवकांना पोलीस भरतीत यश.विद्याधाम विद्यालयातील अभ्यासिकेचा झाला लाभ.!!

परिसरातील सहा युवकांना पोलीस भरतीत यश.विद्याधाम विद्यालयातील अभ्यासिकेचा  झाला लाभ.!!
 निरगुडसर : प्रतिनिधी (प्रा : अरुण गोरडे.):- 
दि :१६/०२/२०२२ कान्हूर मेसाई ( ता. शिरूर)  येथील विद्या विकास मंडळाने येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू केलेल्या अभ्यासिकेचा लाभ ह्या परिसरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना होत आहे.दुष्काळी ग्रामीण भागातील मुलांची अडचण लक्षात घेऊन सुरू केलेल्या या अभ्यासिकेचा हेतू सफल होत असल्याचे चित्र आहे.नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत या अभ्यासिकेतील सहा युवकांना यश मिळाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली.
     आदिवासी विकास मंत्रालयातील कक्ष अधिकारी अजय खर्डे  यांच्या संकल्पनेतून ही अभ्यासिका सुरू झाली आहे. याकामी ग्रामपंचायत कान्हूर मेसाई व विद्या विकास मंडळाने दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.समाजातील दानशूर व स्पर्धा परीक्षेचे महत्व जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी १५ ते २० हजार रुपयांची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कान्हूर मेसाई परिसरातील जवळपास २० ते २५ जणांना या अभ्यासिकेचा लाभ होत आहे. या अभ्यासिकेमुळे परीक्षार्थीचा वेळ व पैसा वाचला आहे.त्यामुळे विद्यार्थी व पालकांनाही दिलासा मिळाला आहे.
     सागर गाजरे याची निवड पिंपरी चिंचवड पोलीस दलात,मंगेश घोलप याची पुणे रेल्वे पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून झाली आहे. तसेच सचिन जिते,महेश कदम,सागर साळवे व दीपक दंडवते यांची बृहन्मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे.नुकत्याच एका कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते या यशस्वी ठरलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला.ग्रामीण  व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका फायदेशीर ठरत आहे.

No comments:

Post a Comment