तलाठ्यानेच बनावट व्यक्ती उभी करून जमिनीची केली खरेदी,गुन्हा दाखल.
पिरंगुट:-कोण काय करेल याचा नेम नाही आपल्याकडे असणाऱ्या पदाचा,अधिकाराचा कसा गैरप्रकार होतो याचे उदाहरण नुकतेच पुढे आले,तलाठ्यानेच बनावट व्यक्ती उभी करून जमिनीची खरेदी-विक्री करण्यात आल्याचा
प्रकार मुळशी तालुक्यात उघड झाला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेला तलाठी यापूर्वी एका तक्रारीमध्ये काही काळासाठी निलंबित सुद्धा करण्यात आला होता.
कुंपणच शेत खात असल्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा संभ्रम सध्या तालुक्यामध्ये आहे. यासंदर्भात पौड पोलिस चौकीत पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडमाळ (ता.
मुळशी) येथील वडिलोपार्जित जमिनीची विक्री 3
भावांनी एकत्र मिळून परस्पर केली. त्या वेळी त्यांनी त्यांची बहीण हिराबाई पंडित यांच्या जागी दुसऱ्याच बनावट महिलेला उभी करून या जमिनीची विक्री सन 1997 मध्ये करण्यात आली. त्यानंतर 15 वर्षांनी म्हणजे सन 2012 रोजी हिराबाई पंडित यांच्या मुलाने अंकुश पंडित (वय 41) यांनी त्याचे मामा साधू वाघु पवार, किसन वाघू पवार व भागू वाघू पवार या
तिघांकडे आईच्या हिश्श्याची जमीन मला द्या, अशी मागणी केली.त्यानंतर या तीन मामांनी अंकुश याला सांगितले की, ही जमीन आम्ही 1997 मध्येच विकली असून, तुझा हिस्सा तू तुझ्या पद्धतीने घे.त्यानंतर जमीन विकत घेणाऱ्यांपैकी नामदेव निवृत्ती पासलकर हे आडमाळलाच राहत असल्याने त्यांच्याकडे अंकुश गेल्यानंतर त्यांना पासलकर यांच्याकडून उलटे सुनावण्यात आले. मामांकडून सर्वच
जमीन विकत घेतली असून काय करायचे ते करा, असे त्याला सुनावले.यानंतर 2 हेक्टर 69 आर क्षेत्र असलेल्या आडमाळ येथील सर्व्हे नंबर 79 मधील हिस्सा नंबर 1 ची सर्व कागदपत्रे अंकुश पंडित यांनी काढल्यानंतर हिराबाई यांच्या जागी बनावट महिलेला उभे करून अंगठा घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. आई जास्त
शिकलेली नसली तरी ती बँकेत सही वगैरे करते,
त्यामुळे हा प्रकार हिराबाई यांना समजताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्या कधीही पौड उपनिबंधक कार्यालयात गेल्याच नाहीत. विशेष म्हणजे खरेदी खतामध्ये त्या वेळी वर्णन केलेले वय व त्यावेळचे वास्तव वय यात खूपच तफावत असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.तलाठी नामदेव पासलकर यांच्यासह सदानंद सतोबा वरघडे (रा. कर्वेनगर पुणे), नारायण महादू तनपुरे(मयत, पत्ता वारजे जकात नाका) आणि विष्णू मारुती
मोरे (रा. दासवे, ता. मुळशी) या चौघांनी ही जमीन विकत घेतली होती. यापैकी पासलकर यांनी ही जमीन नातेवाइकांना खरेदी खताद्वारे लिहून देऊन नंतर दुसऱ्या लोकांना विकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जाब मागणाऱ्या अंकुश पंडित यांना काय करायचे ते कर, तू काय आमचे वाकडे करू शकत नाहीस आणि
न्यायालयात प्रकरण दाखल केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादी अंकुश पंडित यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पंडित यांच्या फिर्यादीवरून खरेदी करणारे चौघे जण व परस्पर विक्री करणारे तीन भाऊ या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौडचे पोलिस निरीक्षक अशोक
धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment