बीड:- जिल्ह्यातील परळी सारख्या ग्रामीण चेहरा मोहरा असलेल्या पण कर्तुत्ववान कष्टाळू आणि आपापल्या क्षेत्रात जिद्दीने काहीतरी करण्याची आस असणाऱ्या माणसांची खाण असणाऱ्या तालुक्यातील हा तरुण.पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता,शेतकरी,व्यावसायिक असा सर्व काही.प्रारंभी घरोघरी जाऊन पेपर टाकण्याच्या कामापासून नंतर दैनिक लोकपत्र या मराठवाडा पातळीवरील दैनिकाच्या जिल्हा प्रतिनिधीत्वाची जबाबदारी,मग पत्रकारितेची पदवी, असा सुरु झालेला वसंत मुंडे यांचा पत्रकारितेचा प्रवास दैनिक लोकसत्ता सारख्या राज्य पातळीवरील अग्रगण्य मराठी दैनिकापर्यंत येऊन पोहचलेला आहे.एखाद्या दैनिकाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ कार्यरत रहाणे ही बोलाची कढी नाही.विश्वास,अपेक्षा,गुणवत्ता,दर्जा, स्पर्धा अशा अनेक गोष्टींचा त्यात कस लागतो.अटी शर्ती आणि कटकटी असतात.अनेक कसोटीचे प्रसंग येतात.त्यात सचोटीची परीक्षा होते.वसंत मुंडे यांनी हे सगळे पाणी तोडत आपले स्वीमिंग चालू ठेवले.पुन्हा पाण्यातल्या कुठल्याही मगरमच्छाशी वैर न करता.एवढे सगळे जलदिव्य पार करुन हा मासा शांत झोपू तरी कसा शकतो,हे विचारायला त्याच्या वंशाला जायला लागेल.ते शक्य नाही, म्हणून त्याच्याशी मैत्री करायला हवी.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना वसंत मुंडे यांनी राज्यभर असे मैत्र जुळवले आहेत.उत्तम संघटन कौशल्य,सुसंवाद,नियमित संपर्क,सातत्याने फिरणे,गाठीभेटी,सहकार्य,समन्वय हा वसंत मुंडे यांचा स्वभाव आहे.पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे धसास लावली.ज्येष्ठ पत्रकारांना त्यांचे घरी जाऊन सन्मानाने अधिस्वीकृती पत्र देण्याची त्यांची कल्पना आणि त्याची केलेली अमलबजावणी मला विशेष भावली.पत्रकारांच्या समस्या अडी अडचणी बाबत वसंत मुंडे सलगपणे मदतकार्य करतात.वैयक्तिक पातळीवर दखल घेतात.तो प्रश्न अडचण सोडविण्यासाठी स्वतः, संघटनात्मक शक्ती आणि संपर्काचा वापर करतात.स्थानिक प्रशासकीय पातळीपासून सरकार दरबारी पाठपुरावा करतात.हे करताना कुठल्याही प्रकारचा अहंभाव नाही.भेद नाही. हातचा राखून ठेवणे नाही. मला वाटते हीच वसंत मुंडे यांच्या लोक संग्राहक व्यक्तिमत्वाची खरी ताकद आहे.
- रवींद्र तहकीक
कार्यकारी संपादक
दैनिक लोकपत्र
..... १९९५ मध्ये मी बीड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झालो.शासकीय , निमशासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाभरात दौरे होत.अशाच एका दौऱ्यात अंबाजोगाईत वसंत मुंढे या तरुण पत्रकाराची ओळख झाली.स्नेह जुळला. आजवर तो कायम आहे.
अंबाजोगाई येथून बीडला आल्यावर वसंत मुंढे यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. एकेकाळच्या वसंताला आणि आजच्या वसंतराव यांना पत्रकारितेबरोबरच पत्रकारांच्या संघटनेत काम करताना मी जवळपास सुरुवातीपासून पाहिले.योजकता आणि संघटन वृत्तीला थेट भिडण्याच्या निर्भीड स्वभावाची जोड आहे.त्यामुळे लहानमोठे अधिकारी असोत की कोणत्याही स्तरावर कार्यरत असलेले नेते , त्यांचे दरवाजे वसंतरावांना उघडे असतात. सर्वत्र आणि सर्व स्तरात प्रभावी आणि सकारात्मक संपर्क असलेले वसंतराव पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरत असतात.आपण सदैव कार्यरत राहावे आणि नेतृत्व करावे ही आकांक्षा त्यांच्या व्यक्तीमत्वात स्पष्टपणे जाणवते. गेल्या वीस वर्षांतील महत्वाच्या घटना - घडामोडींवर आमची कधी प्रत्यक्ष तर कधी फोनवर चर्चा झाली आहे.१९९९ पासून बहुतेक लोकसभा / विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम्ही परस्परांशी अंदाज व्यक्त करत आलो आहोत. आमच्या मित्रत्वात त्यांचे किंवा माझे पद असा संदर्भ नव्हता.त्यामुळेच आमची मैत्री दृढ आणि कधी परस्परविरोधी मतं असून कायम राहिली.राहणारही आहे. वसंतराव मुंढे यांना मनापासून शुभेच्छा..
राधाकृष्ण मुळी, सेवानिवृत्त माहिती संचालक, औरंगाबाद.
No comments:
Post a Comment