राज्यातील ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखड्यात
वृत्तपत्र खरेदीसाठी १० हजारांची तरतूद करावी - जळगाव येथील पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची मागणी
जळगाव :- सोशल मीडियाच्या काळातही वृत्तपत्रे तग धरून आहेत, याचाच अर्थ काही प्रमाणात खप कमी झाला असला तरी विश्वासार्हता मात्र कायम टिकून आहे. वृत्तपत्र व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींनी वृत्तपत्र खरेदीसाठी वार्षिक आराखड्यात १० हजार रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत वसंत मुंडे यांनी पत्रकारांचे हक्क, वृत्तपत्रांचे अर्थकारण अशा विविध मुद्यांवर चर्चा केली. पुढे बोलताना मुंडे यांनी सांगितले, वृत्तपत्रे टिकणे काळाची गरज आहे. यासाठी ग्राम पातळीवरही व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील ग्रामपंचायतींनी वृत्तपत्र खरेदीसाठी आपल्या वार्षिक आराखड्यात १० हजार रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे. जळगाव शहरातील पद्मावती विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार
संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खानदेश अध्यक्ष किशोर रायकडा,
प्रमोद सोनवणे,भगवान मराठे, योगेश सैतवाल,सुरेश पवार,भूषण महाजन,दीपक सपकाळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मंत्री गिरीश महाजन यांना शिष्टमंडळ भेटणार : वसंत मुंडे
संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींनी वृत्तपत्र खरेदीसाठी वार्षिक आराखड्यात १० हजार रुपयांची तरतूद करावी, ही मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ लावून धरणार असून याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीष महाजन यांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment