वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन उत्साहात संपन्न..! समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा – प्रतापराव जाधव. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 2, 2026

वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन उत्साहात संपन्न..! समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा – प्रतापराव जाधव.

वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन उत्साहात संपन्न..!

*समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा – प्रतापराव जाधव*
वाशिम (प्रतिनिधी):
समाजात घडणाऱ्या घटना व प्रश्नांवर सत्य आणि निःपक्षपाती दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी केले. पत्रकार हा समाज आणि शासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, समाजाला जागृत करणे आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी पत्रकारांनी सातत्याने पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील वैकुंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर, वाटाणे लॉन येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. दिनकरराव वाटाणे होते. विशेष उपस्थिती म्हणून भागवताचार्य प.पू. रमाकांत व्यास, प.पू. गजानंद माऊली, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर व मातोश्री स्नेहलता सोमाणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान देण्यात आला. भागवताचार्य डॉ. रमाकांत व्यास यांना ‘संत सेवाश्री’, दिनकरराव वाटाणे यांना ‘वारकरी सेवा’, डॉ. हेमराज लाहोटी, डॉ. हरीश बाहेती, डॉ. सरोज बाहेती यांना ‘विदर्भ भूषण’, श्रीमती शिलाताई राठी व ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तसेच विविध समाजसेवक, उद्योजक, पत्रकार व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक व ‘विश्व कल्याण प्रार्थना’ प्रदान करण्यात आली. राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
विचारमंथन सत्रात पत्रकारितेच्या मूल्यांवर भर:
द्वितीय सत्रात ‘पत्रकारांचा डीएनए काय?’, ‘सायबर युगातील माध्यमे व मूल्यनिष्ठ पत्रकारिता’ या विषयांवर चर्चासत्र झाले. ज्येष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे यांनी सत्य, संयम व समाजहित हाच पत्रकाराचा खरा डीएनए असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबाबत पत्रकारांनी सजग राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पत्रकारांसाठी ‘लाडका पत्रकार योजना’ सुरू करण्याची मागणी मांडली.

१५ ठरावांना एकमुखी मंजुरी:
अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने १५ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. ठरावांचे वाचन डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी एकमुखाने ठरावांना मंजुरी दिली.

कार्यक्रमात संत सावता माळी क्रीडा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले. वारकरी दिंडी, लेझीम पथक व विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी सोहळ्याला रंगत आणली.

राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना आकर्षक बॅग, डायरी, पेन व दिनदर्शिका भेट देण्यात आली. वाशिम येथे अनेक वर्षांनंतर राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनाचे यशस्वी आयोजन झाल्याने जिल्ह्याच्या नावाची राज्यभरात चर्चा होत आहे.
 *महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात ठरावांची जोरदार मांडणी!*


पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने वाशिम येथे राज्यस्तरीय एकदिवसीय अधिवेशन उत्साहात पार पडले. अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या हक्क, सवलती व कल्याणकारी योजनांबाबत एकूण १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.

अधिवेशनातील प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे:

1. शासनमान्य यादीवरील लघु वृत्तपत्रांना मुद्रण व कोऱ्या कागदावरील जीएसटीमधून सूट देण्यात यावी, कारण सध्या भरलेली जीएसटी रक्कम रिबेट स्वरूपात परत मिळत नाही.

2. ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीच्या अटी शिथिल करण्यात याव्यात. ३० वर्षांचे सलग पुरावे, नेमणूक पत्र, वेतनपत्र, सेवामुक्ती पत्र आदी कारणांवरून वयोवृद्ध पत्रकारांना नाकारले जाणे थांबवावे.

3. महापुरुषांच्या जयंतीप्रमाणेच स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ, समाजजिर्णोद्धारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून दर्शनी जाहिराती वितरित कराव्यात.

4. अधिस्विकृती पत्रासाठीच्या अटी सुलभ कराव्यात. ग्रामीण पत्रकारांना कमी कागदपत्रांमध्ये अधिस्विकृती द्यावी. लघु साप्ताहिकांना किमान ३ व लघु दैनिकांना किमान ५ अधिस्विकृती पत्रांचा कोटा द्यावा.

5. शासनमान्य यादीवर नसलेल्या पण नियमित प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांना १ मे, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व दिवाळी निमित्त वर्षातून ४ जाहिराती पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू कराव्यात.

6. पत्रकारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवून बँक कर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात व इतर आवास योजनांमध्ये आरक्षण द्यावे.

7. आरटीई कायद्यातून संपादक व पत्रकारांच्या पाल्यांसाठी विशेष आरक्षण व सवलती द्याव्यात.

8. पीआरजीआय प्रेस सेवा पोर्टलप्रमाणे युट्युब व डिजिटल पोर्टल माध्यमांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात यावे.

9. अधिस्विकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन मंडळाच्या रातराणी शिवाई ई-बस सेवेत इतर बसेसप्रमाणे प्रवास सवलत द्यावी.

10. सत्य वृत्तांना रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हक्कभंग तरतुदींचा पुनर्विचार करून माध्यम व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवावे.

11. मागील शासनकाळात जाहीर करण्यात आलेल्या पत्रकार कल्याणकारी मंडळ व वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.

12. वृत्तपत्र नोंदणी व दुरुस्तीसाठी आकारली जाणारी १००० रुपयांची फी व ५०० रुपयांच्या बाँडवरील शपथपत्राची अट रद्द करून सर्व सेवा पूर्वीप्रमाणे मोफत कराव्यात व शपथपत्र साध्या कागदावर स्वीकारावे.

अधिवेशनात सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले असून, राज्य शासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटना अधिक तीव्रपणे लढा उभारेल, असा निर्धारही अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment