बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मानवी गर्भ (अभ्रक) आढळून आल्याची घटना – तपास सुरू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 4, 2026

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मानवी गर्भ (अभ्रक) आढळून आल्याची घटना – तपास सुरू

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मानवी गर्भ (अभ्रक) आढळून आल्याची घटना – तपास सुरू
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वोदय नगर, आमराई, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक 04/06/2026 रोजी सायंकाळी स्थानिक नागरिकांकडून एका पडीक घरामध्ये मानवी गर्भासारखे अभ्रक पडले असल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली.

सदर माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी व पंचनामा करण्यात आला.

घटनास्थळी मानवी स्त्री जातीचा अंदाजे पाच महिन्यांचा गर्भ (अभ्रक) आढळून आला. सदर गर्भाची विघटन प्रक्रिया सुरू झालेली होती. प्राथमिक पाहणीत सदर अभ्रक हे अंदाजे पाच महिन्यांच्या बालिकेचे जैविक अवशेष (Biological Waste) असल्याचे दिसून आले. तथापि, सदर गर्भ घटनास्थळी कोणत्या परिस्थितीत आला, त्याची माता कोण आहे, गर्भ नैसर्गिकरित्या बाहेर पडला की अन्य कोणत्या कारणाने बाहेर काढण्यात आला याबाबत सध्या कोणताही निश्चित निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

घटनास्थळावरील पंचनामा, छायाचित्रण व व्हिडीओग्राफी करण्यात आली असून सदर अभ्रक पुढील वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन व इतर आवश्यक वैज्ञानिक परीक्षणासाठी सिल्वर जुबली हॉस्पिटल, बारामती येथे पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 224/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 94, 238, 239 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. करे करीत आहेत.

बारामती शहरातील नागरिकांनी सदर घटनेबाबत घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. पोलीस प्रशासनाकडून सर्व आवश्यक कायदेशीर, वैद्यकीय व वैज्ञानिक तपास प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

तसेच सदर प्रकरणाबाबत कोणास कोणतीही माहिती असल्यास अथवा संबंधित व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.


प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन
ता. बारामती, जि. पुणे ग्रामीण

No comments:

Post a Comment