अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी; सुनेत्रावहिनी पवार यांचे भावनिक आवाहन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 9, 2026

अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी; सुनेत्रावहिनी पवार यांचे भावनिक आवाहन

अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी; सुनेत्रावहिनी पवार यांचे भावनिक आवाहन
*‘कारखाना हा कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या संसाराचा आधार’*

बारामती:- सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना, कारखान्याच्या भवितव्याचा विचार करून सभासदांनी योग्य निर्णय घ्यावा, असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी केले. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांनी पाहिलेली स्वप्ने आणि अपूर्ण राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी सभासदांची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री सोमेश्वराच्या चरणी वंदन करून आणि कनेरीच्या मारुतीरायाला नमन करून सुनेत्रावहिनींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय मुकुटराव आप्पा काकडे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्मरण करत त्यांनी अजितदादांना विनम्र अभिवादन केले. उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसून हजारो शेतकरी सभासदांच्या संसाराचा आधार आहे. कारखान्याशी शेतकरी, कामगार आणि त्यांची कुटुंबे जोडलेली आहेत. त्यामुळे कारखान्याची प्रगती म्हणजे या सर्वांच्या आयुष्यातील प्रगती होय. कारखाना कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नसून सभासद हेच त्याचे खरे मालक आहेत, ही भूमिका अजितदादांनी कायम जपली, असे सुनेत्रावहिनी म्हणाल्या.
अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक असून त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही प्रत्येकाला जाणवत आहे. मात्र, दादांची शिकवण केवळ दुःखात राहण्याची नव्हती, तर संकटांचा सामना करून पुढे जाण्याची होती. दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेला पोरके होऊ द्यायचे नाही, हा निर्धार करून आपण जबाबदारी स्वीकारली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रचाराच्या निमित्ताने सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अजितदादांच्या आठवणी अनुभवायला मिळाल्या. कुणाच्या घरातील छायाचित्रातून, कुणाच्या डोळ्यांतील अश्रूंमधून, तर कुणाच्या आठवणींतून दादा आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे जाणवले. जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास आयुष्यभर विसरणार नाही. या प्रेमाचे ऋण विकासकामांच्या माध्यमातून फेडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या निमित्ताने बदललेल्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना त्यांनी कारखान्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. कोण आपला आणि कोण परका, अशी विभागणी करण्यापेक्षा कारखान्याचे हित सर्वोच्च मानले पाहिजे. सभासदांनीही निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन कारखान्याच्या भवितव्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची कमतरता यामुळे आगामी काळात कारखान्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत. यंदाच्या गाळपाबरोबरच पुढील वर्षाच्या ऊस उपलब्धतेचे नियोजन आतापासून करावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, शेतीचे नियोजन आणि कारखान्याचे सक्षम व्यवस्थापन यावर भर देणे आवश्यक आहे. शेतकरी, ऊस उत्पादन आणि कारखाना यांची आर्थिक नाळ एकमेकांशी जोडलेली असल्याने या सर्व बाबींचा एकत्रित विचार करावा लागेल, असे त्या म्हणाल्या.

कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत आणि व्यवस्थापनाबाबत होत असलेल्या आरोपांवर बोलताना सुनेत्रावहिनींनी आरोप-प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष कामातून उत्तर देण्याची अजितदादांची शिकवण असल्याचे नमूद केले. कारखान्याचा विकास, सभासदांचे हित आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढविणे हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीला आता अंतिम टप्पा गाठला असून प्रत्येक कार्यकर्ता आणि सभासदाने जबाबदारीने काम करण्याची ही वेळ आहे. अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समजून घ्यावी. गावातील नाती, मैत्री आणि भावकी जपत कारखान्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेवटी, अजितदादांवरील प्रेम आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता कृतीतून व्यक्त करण्याची संधी सभासदांना मिळाली आहे. त्यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘अजितदादा विकासपुरुष पॅनल’ला कपबशी या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करून बहुमताने विजयी करावे, असे आवाहन सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment