बारामती नगर परिषदेसमोर १७ प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत चक्री धरणे आंदोलन सुरू! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 23, 2026

बारामती नगर परिषदेसमोर १७ प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत चक्री धरणे आंदोलन सुरू!

बारामती नगर परिषदेसमोर १७ प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत चक्री धरणे आंदोलन सुरू!
अतिक्रमणधारकांच्या घरांचे नियमन, मूलभूत सुविधा आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले

बारामती:-बारामती शहरातील विविध नागरी समस्या आणि नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांवर वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास तुकाराम निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आज, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ पासून बारामती नगर परिषदेसमोर बेमुदत चक्री धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात शहरातील विविध भागांतील नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले असून, प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून प्रामुख्याने १ जानेवारी २०११ पूर्वीची पात्र निवासी अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमित करणे, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील नागरिकांच्या हिताविरोधातील ठराव रद्द करणे, विविध नगरवस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक स्वच्छता व शौचालयांची दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणे, तसेच अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांच्या वस्त्यांमधील आरोग्य व नागरी सुविधांचे प्रश्न सोडविणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण, अतिक्रमणधारकांच्या घरांचे नियमन, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, शहरातील बॅनर व जाहिरात फलकांबाबत नियमांची अंमलबजावणी, कंत्राटी कामगारांच्या वेतन व सुविधांचे प्रश्न आणि इतर प्रलंबित नागरी मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

“नागरिकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनामुळे बारामती शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्यात आले असून, नगर परिषद प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मंगलदास तुकाराम निकाळजे
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ

No comments:

Post a Comment