*कारगिल गौरव पुरस्काराचे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील हस्ते वितरण*
*कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची 'सरहद'ची भूमिका कौतुकास्पद...गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील*
पुणे, दि. 25 : कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची सरहदची भूमिका महत्वा ची आहे, असे कौतुकोद्वार गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी काढले.
सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाशपर्व निमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कारगिलचे एक्झीक्युटीव्ह काँन्सिलर आगा सैय्यद अब्बास रिझवी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तेग बहादूर प्रकाशपर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आयोजक संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते.
गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, 22 वर्षापूर्वी कारगीलचे युध्द झाले. आपल्याला विजय मिळाला. कारगिल प्रदेशाची जोडलेल्या मुला-मुलींना इथे आणून त्यांना शिक्षण देण्याचे काम सरहद संस्थेच्यावतीने केले जाते. म्हणून आजचा कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतात, परंतु पुरस्काराचे महत्व् पाहिले तर आज दिलेले पुरस्कार हे विशेष आहेत, असे सांगून ते पुढे म्हणाले, समाजाच्या हिताच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. एखादे विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे. यातून एक नवीन आदर्श निर्माण होतो. योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याने मनाला आनंद होतो. अशा कार्यक्रमात अधिकाधिक सहभागी झाले पाहिजे.
अतिवृष्टी, पुराचे संकट महाराष्ट्रातील जनतेवर आले आहे. दरड कोसळून अनेक निष्पाप जीव गेले त्यांच्याप्रती श्री.वळसे- पाटील यांनी सहवेदना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, नैसर्गिक संकट असो अथवा देशाच्या सीमेवरील संकट असो. संकटाचा सामना धैयाने केला पाहिजे. संकटाला तोंड देण्याचे काम त्या-त्या क्षेत्रात काम करणारे करत असतात. सरहद संस्थेच्या कार्याला सतत सहकार्य राहील असे सांगून कारगिल गौरव पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगा सैय्यद अब्बास रिझवी (एक्झीक्युटीव्ह काँन्सिलर, लेह-कारगिल), डॉ. अपश्चिम बरंठ (कोवीड मालेगाव पॅटर्न), डॉ. विजय कळमकर (कोवीड मालेगाव पॅटर्न), डॉ. अनिल पाचणेकर (धारावी पॅटर्न), राकेश भान (मॅनेजिंग डायरेक्टर फिशर ग्रुप), उमा कुणाल गोसावी (शौर्य पदक विजेता वीरजवान पत्नी), डॉ. सतिश देसाई (अध्यक्ष- पुण्यभूषण फाऊंडेशन) आणि विजय बाविस्कर (समूह संपादक- लोकमत) यांना श्री. दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment