गरिबांचे मरण स्वस्त, पैशाने भरपाई होईल का? रुग्ण हक्क परिषदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 7, 2021

गरिबांचे मरण स्वस्त, पैशाने भरपाई होईल का? रुग्ण हक्क परिषदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

गरिबांचे मरण स्वस्त, पैशाने भरपाई होईल का? रुग्ण हक्क परिषदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

अहमदनगर :- यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा आगीने होरपळून मृत्यू झाला. एप्रिलमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात सुमारे २५ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आज भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीच्या सणात अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आगीत होरपळून पंधरापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू तर सुमारे २० जखमी रुग्णांना इतरत्र उपचारांसाठी हलविण्यात येत आहे. इतक्या गंभीर घटना घडल्यानंतर ही राज्याच्या आरोग्य यंत्रणेला जाग येणार आहे का? मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या रुग्णांना दोन - पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करून गरिबांचे मरण स्वस्त झाले आहे, असेच 'सत्य' आणि 'वास्तव' अधोरेखित केले जात आहे. महा विकास आघाडी सरकारच्या काळात गरिबांच्या जीवाशी खेळायचे कधी थांबणार आहे? असा सवाल रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना आज विचारला आहे.
    अशा दुर्दैवी घटनांमुळे सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास उडाला असल्याची लोकांची भावना निर्माण झाली आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आग्रही मागणी रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्राद्वारे केली.
      अहमदनगर जिल्ह्यातील गरीब शेतकरी आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे मरण स्वस्त झाले आहे. बडे राजकारणी आणि मोठ्या उद्योगपतींच्या बाबतीत अशी घटना स्वप्नात तरी घडेल का? सामान्य आणि गरीब मध्यमवर्गीय नागरिकांना खाजगी पंचतारांकित हॉस्पिटलमधील उपचार परवडणारे नाहीत, म्हणून त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये दर वेळी मृत्यू ची परीक्षा द्यायची का? रुग्णालयांची तपासणी आणि फायर ऑडिट आणि मेंटेनन्स च्या नावाखाली  दरवर्षी बोकाळणारा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार यामुळेच आज सरकारी यंत्रणेच्या हलगर्जी कारभाराने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
        सरकार जखमींना दोन लाख, मृत्यू मुखी पडलेल्या नागरिकांना पाच लाख रुपये अशा पद्धतीची काहीतरी मलमपट्टी साठी घोषणा करेल त्यामुळे लोकांचे गेलेले जीव परत येणार आहेत का? असा सवाल उपस्थित करत असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाच पाहिजे, अशा पद्धतीची संतप्त लोकभावना निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहून कळविले आहे, असे चव्हाण म्हणाले.

No comments:

Post a Comment