वृत्तपत्र विकत घेणार्‍यांना आयकरात सवलत देऊ -डॉ.भागवत कराड पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार वितरणात घोषणा,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 17, 2022

वृत्तपत्र विकत घेणार्‍यांना आयकरात सवलत देऊ -डॉ.भागवत कराड पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार वितरणात घोषणा,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद..

वृत्तपत्र विकत घेणार्‍यांना आयकरात सवलत देऊ -डॉ.भागवत कराड                                        पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार वितरणात घोषणा,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद..
औरंगाबाद (प्रतिनिधी):- मराठवाड्यातील माणसाला कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यानंतर प्रत्येकानेच त्याचा योग्य उपयोग केला. वसंत मुंडे यांनीही पत्रकारीतेच्या क्षेत्रात राज्यभरातील पत्रकारांचे मजबुत संघटन उभे करुन या क्षेत्रातील प्रश्‍न मांडून सोडवण्यासाठीचे मार्गही सांगितले आहेत. मलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले. लोकशाहीत वृत्तपत्र समाजाला जागृत करुन दिशा देण्याचे काम करत असल्याने मला केंद्रात मिळालेल्या संधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपला पुढाकार राहील. वसंत मुंडे यांच्या मागणीनुसार वृत्तपत्र विकत घेणार्‍या आयकरदात्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपये कर सवलत देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केली.  
औरंगाबाद येथे रविवार दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि दैनिक मराठवाडा साथी संयुक्त विद्यमाने पत्रमहर्षी मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार वितरण केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, जगदीश बियाणी, मनिषा बन्साळी, सतीश लोढा यांची उपस्थिती होती. 
यावेळी बोलतांना डॉ.कराड म्हणाले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी वसंत मुंडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभर विविध उपक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांना प्रोत्साहन देणे, त्यांचे प्रश्‍न मांडून सोडवणे. उपक्रम राबवणे यामुळे संघटनात्मक काम वाढले आहे. मी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला आलो आहे. पत्रकार व वृत्तपत्रांचे प्रश्‍न मांडून ते सोडवण्यासाठीचे मार्गही मुंडे यांनी सांगितले आहेत. लोकशाहीत वृत्तपत्र आणि पत्रकार हे समाजाला जागृत करण्याचे आणि दिशा देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपला पुढाकार राहील. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध आर्थिक योजनांचा पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना लाभ मिळावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घेवू. यासाठी पत्रकारांनी केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करुन त्याचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. कोरोनानंतर वृत्तपत्र व्यवसायासमोर आर्थिक संकट आले आहे. डिजिटल मिडीयाचे प्रस्थ वाढले असले तरी आजही वृत्तपत्रांची विश्‍वासार्हता समाजात कायम आहे. म्हणुन वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक ताकद देण्याचे सरकार म्हणुन आमची जबाबदारी आहे. यासाठी वसंत मुंडे यांच्या मागणीनुसार वृत्तपत्र खरेदी करणार्‍या आयकरदात्यांना वार्षिक पाच हजार रुपये करात सुट देण्याची मागणी योग्य असुन ती मंजुर करुन घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करू. यासाठी पत्रकार संघाने एक समिती स्थापन करुन प्रस्ताव केंद्र सरकारकडे द्यावा अशी सुचनाही त्यांनी केली. 
तर वसंत मुंडे यांनी वृत्तपत्र व्यवसायासमोरील आर्थिक अडचणी आणि पारंपारीक धोरण याबाबत स्पष्ट भूमिका मांडून लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार व वृत्तपत्रांना आर्थिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने वृत्तपत्र विकत घेणार्‍या करदात्यांना करात सवलत देण्याची मागणी केली. त्याच पध्दतीने पत्रकार आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याशिवाय तो चांगल्या पध्दतीने काम करू शकणार नाही. यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन वृत्तपत्र क्षेत्राला मदत करावी असे आवाहन केले. 
प्रास्तविकात चंदुलाल बियाणी यांनी दै.मराठवाडा साथीच्या वाटचालीचा आढावा घेऊन स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रावण गिरी, प्रशांत जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप बेद्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास शिंगी, मुकेश मुंदडा, राधेशाम झंवर, सचिन शेरे, वृषाली पेंढारकर, सविता खांडेकर, राहूल राठी, मनोज पाटणी, संजय व्यापारी, माजेद खान, सचिन पवार, तुकाराम राऊत, शिवानंद चक्करवार,पांडुरंग जाधव आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी राज्यस्तरीय पुरस्काराने प्रो.डॉ.दिनकर माने (विभाग प्रमुख, जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), डॉ. बबन जोगदंड (प्रभारी अधिकारी, यशदा, पुणे), संतोष मानूरकर (संपादक दै.दिव्य लोकप्रभा, बीड) यांच्यासह अनेक पत्रकारांना यावेळी पुरस्कार देवून केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे, प्रकाश भगनुरे, डॉ. संजिवकुमार सावळे, डॉ.संध्या मोहिते, संतोष शिंदे, राम वायभट आदिंसह विविध दैनिकांच्या पत्रकारांची उपस्थिती होती.
वसंत मुंडे यांच्या प्रयत्नाला यश
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वृत्तपत्राला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वृत्तपत्राची किंमत वाढ यासह अनेक महत्वाच्या भुमिका सातत्याने मांडल्या. तसेच वृत्तपत्र विकत घेणार्‍यांना आयकरातून सवलत मिळावी, ही मागणी लावून धरली या कर सवलतीमुळे सरकारचाही फायदा होणार आहे, हे शास्त्र शुध्द पद्धतीने समजावून सांगितले. ही सवलत दिल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच वृत्तपत्र व्यवसायामध्ये क्रांतीकारी बदल होणार असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आनुन दिले, त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी या कार्यक्रमात महत्वपूर्ण घोषणा केली. वसंत मुंडे यांच्या मागणीला मिळालेले हे अभुतपूर्व यशच म्हणावे लागेल. कर सवलतीचा निर्णय जेव्हा प्रत्यक्षात अमलात येईल तेव्हा, वृत्तपत्र व्यवसायामध्ये अर्थिक क्रांतीचे नवे पर्व सुरू होईल आणि याचे श्रेय मराठवाड्याच्या या दोन भूमीपुत्रांना असेल.

बियाणी परिवाराशी कौटुंबिक नाते ! 
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी या प्रसंगी बोलतांना दै.मराठवाडा साथी आणि बियाणी परिवार यांचे विशेष कौतुक केले. स्व.मोहनलालजी बियाणी यांनी 43 वर्षापुर्वी परळी सारख्या गावातून पत्रकारीतेची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचा वारसा पुढे चालवताना त्यांच्या तीनही मुलांनी लौकिकामध्ये भर टाकण्याचे काम केले. स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे बियाणी परिवाराशी जसे कौटुंबिक संबंध होते तसेच माझे सुध्दा आहेत. येणार्या काळात दै.मराठवाडा साथीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे केंद्रीयमंत्री कराड म्हणाले.

No comments:

Post a Comment