वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवूउपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना ग्वाही.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 8, 2022

वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवूउपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना ग्वाही..

वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना ग्वाही..
बीड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मागणीवरुन वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपयांची सुट देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे पाठवेल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना दिली.
अंबाजोगाई येथे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी शुक्रवार दि. 8 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संतोष मानूरकर, वैभव स्वामी यांनी भेट घेऊन कोरोनामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्यासाठीची मागणी केली. वर्षभरापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना वार्षिक पाच हजार रुपयांची सुट द्यावी अशी मागणी लावून धरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या मागणीबाबत वसंत मुंडे यांनी सविस्तर माहिती दिली. मागणीबाबतची वस्तुस्थिती जाणुन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मागणीचे स्वागत करुन तात्काळ राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला जाईल. पत्रकार संघाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. राज्य सरकारचे पूर्ण समर्थन राहील अशी ग्वाही दिली. तर पत्रकारांच्या इतरही मागण्यांबाबत लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वृत्तपत्र व्यवसाय जाहिराती कमी झाल्यामुळे आणि विक्री किंमत उत्पादन खर्चापेक्षा केवळ तीस टक्के असल्याने अडचणीत आला आहे. कागदाचे भाव वाढल्यामुळे तर अडचणीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे राज्यभरातील वृत्तपत्रात काम करणार्‍या पाच लाख लोकांचा रोजगार अस्थिर झाला असल्याची वस्तुस्थिती अजित पवार यांना सांगितल्यानंतर त्यांनी या व्यवसायाला मदत करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्य सरकार प्रस्ताव देणार असल्याने पत्रकार संघाच्या मागणीला अधिक बळ मिळणार आहे.

No comments:

Post a Comment