२६ वर्षांनी पुन्हा गजबजला इयत्ता दहावीचा वर्ग.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 3, 2023

२६ वर्षांनी पुन्हा गजबजला इयत्ता दहावीचा वर्ग..

२६ वर्षांनी पुन्हा गजबजला इयत्ता दहावीचा वर्ग..
बारामती :– एक-दोन वर्ष नव्हे तर तब्बल २६ वर्षांनी अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयातील १९९६-९७ मधील इयत्ता दहावीचा वर्ग पुन्हा गजबजला. निमित्त होते, माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या तुकडीचे सर्व विद्यार्थी २६ वर्षांनी पुन्हा भेटल्याने वातावरण भारावून गेले होते. एकमेकांच्या गाठीभेटी घेत विद्यार्थी अन् शिक्षकांनी आठवणींना उजाळा दिला.
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. शाळेच्या १९९६-९७ तुकडीचे इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी या मेळाव्यासाठी हजर होते. शाळेचे माजी मुख्याध्यापक घाटगे सर कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यमान मुख्याध्यापक शरद रणवरे, ज्येष्ठ शिक्षक देवकाते सर, चव्हाण सर, घरजारे सर, साबळे सर, भोसले सर, शिंदे सर, सोनवणे सर, कुचेकर सर, चांदगुडे सर, घारपुरे सर, शिर्के मॅडम, सय्यद मॅडम यांच्या आजी-माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकही फेटे बांधून कार्य़क्रमात सहभागी झाले. एकमेकांच्या गाठीभेट, गळाभेट घेत विद्यार्थ्यांनी आठवणींची देवाणघेवाण केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गुरूपौर्णिमेच्या औचित्य साधत उपस्थित सर्व गुरुजनांचे माजी विद्यार्थिनींनी पुजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. रणवरे सरांची कार्यक्रमाच्या आदल्यादिवशीच शाळेच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली. तसेच दोन फॅनही शाळेला भेट देण्यात आले. 
शाळेत होणारा पहिलाच विद्यार्थी मेळावा असल्याने सर्वच शिक्षकांनी भरभरून आपल्या भावना व्यक्त केल्या. जुन्या आठवणींना उजाला देताना काहींचे डोळे पाणावले होते. आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या पुन्हा झालेल्या भेटीने शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सर्व विद्यार्थ्यांच्या भावनाही अशाच होत्या. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले. विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे संगीत खुर्चीचा खेळ खेळत हे ऋणानुबंध अधिक घट्ट केले. शाळेच्या आवारात इतक्या वर्षांनी पुन्हा भरलेला हा वर्ग सर्वांच्याच कायम स्मरणात राहील, अशीच भावना होती. वृक्षारोपण आणि स्नेहभोजनाने मेळाव्याचा समारोप झाला. कार्यक्रमांचे संपूर्ण संयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

No comments:

Post a Comment