बारामती मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्न..
बारामती:-बारामती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आज अभियांत्रिकी महाविद्यालय, माळेगाव येथे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार स्वप्निल रावडे उपस्थित होते.
तसेच बारामती तालुक्यात सहा गट, बारा गण आणि एकूण २९९ मतदार केंद्रे असून या केंद्रांवर कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले.
प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये घेण्यात आले. सकाळच्या सत्रात ८०० तर दुपारच्या सत्रात ८०० अशा एकूण १ हजार ६०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या नियंत्रण युनिट, बॅलेट युनिट तसेच मतदान कक्षामध्ये यंत्रांची योग्य मांडणी कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्रांची हाताळणी, कार्यपद्धती व खबरदारीचे मुद्दे समजावून सांगण्यात आले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व विश्वासार्हपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने कोणतीही चूक न करता जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. निवडणुकीतील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांची भूमिका निर्णायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ या वेब सिरीजचे सुप्रसिद्ध कलाकार रामभाऊ जगताप यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, तालुका स्वीप प्रमुख सविता खारतोडे उपस्थिती होत.
तसेच भव्य रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
No comments:
Post a Comment