बारामती :- बारामतीतील बेपत्ता बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला,नीरा कालव्यात मृतदेह सापडले,सातारा जिल्ह्यातील नीरा कालव्यात बारामती तालुक्यातील एका सख्ख्या बहीण-भावाचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. किरण काकासाहेब चोपडे (वय २६)आणि काजल काकासाहेब चोपडे (वय २३, रा.मेखळी, ता. बारामती) अशी या दुर्दैवी घटनेत प्राण
गमावलेल्या भावंडांची नावे आहेत. हे दोघेही फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाले होते आणि त्यानंतर बरोबर तीन दिवसांनी त्यांचे मृतदेह माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते गुरसाळे हद्दीतील नीरा उजवा कालव्यात आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काजल काकासाहेब चोपडे ही फलटणमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती तिच्या तिसऱ्या वर्षाच्या प्रोजेक्टसंदर्भात माहिती घेण्यासाठी आणि प्रोजेक्टच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी आपल्या भावासोबत कॉलेजला गेली होती. मंगळवारी, ७ एप्रिल
रोजी दुपारी हे काम उरकून ते कॉलेजच्या बाहेर पडले.मात्र, त्यानंतर ते दोघेही आपल्या घरी परतलेच नाहीत.यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्वरित फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.पोलिसांकडून या बेपत्ता भावंडांचा शोध सुरू असतानाच, नीरा उजवा कालव्यात दोघांचेही पार्थिव असल्याची माहिती मिळाली. नातेपुते पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह
कालव्यातून बाहेर काढले आणि घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक
विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी स्पष्ट केले की, सध्या तरी या घटनेत कोणताही घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता वाटत नाही.दोघांच्याही शरीरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे,त्यांचे मोबाईल देखील कालव्यातच सापडले आहेत. सध्या पोलीस त्यांच्या दुचाकीचा शोध घेत आहेत. दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन ते
दुचाकीसह कालव्यात पडले असावेत, या शक्यतेवर देखील पोलीस तपास करत आहेत. आता पोलिसांना या दोघांच्याही मोबाईलच्या सीडीआर (CDR)रिपोर्टची प्रतीक्षा असून, तो मिळाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेवर अधिक प्रकाश पडेल.याबाबत अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment