शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तलाठी हनुमंत शिंदे यांच्याकडून पीक पाणी नोंद
आगामी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी पीक पाणी नोंद करण्याचे आवाहन
माळेगाव बु. : आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांची वस्तुनिष्ठ नोंद होणे महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने माळेगावचे तलाठी हनुमंत शिंदे हे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून पीक पाणी नोंद करत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची स्थिती व लागवडीची नोंद करण्यात येत आहे. आगामी काळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाच्या विविध योजना, मदत व नुकसानभरपाईसाठी पीक पाणी नोंद महत्त्वपूर्ण ठरू शकते.
त्यामुळे माळेगाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पीक पाणी नोंद करून घ्यावी, असे आवाहन तलाठी हनुमंत शिंदे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव, गौरव जाधव, योगेश जाधव, उदयसिंह जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी व नोंदणी करण्याच्या या उपक्रमामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी थेट शेताच्या बांधावर पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment