बारामती :-मिळालेल्या माहितीनुसार नुकताच बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेरेवाडी परिसरात दोन ज्येष्ठ महिलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या बाहेरील ओसरीत झोपलेल्या दोन्ही महिलांचा अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत महिलांची ओळख इंदुबाई मारुती लडकत (75) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (65) अशी करण्यात आली आहे. यातील इंदुबाई या बाबुर्डीच्या माजी सरपंच होत्या. दोघीही एकमेकींच्या शेजारी राहत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला नेहमीप्रमाणे रात्री घराच्या ओसरीबाहेर झोपल्या होत्या. सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने इतरांना माहिती दिली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर दोघीही मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हल्लेखोर कोण होता, तो नेमका कधी घटनास्थळी आला आणि या दोन्ही महिलांना लक्ष्य करण्यामागे काय कारण होते, याचा शोध घेतला जात आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे बाबुर्डी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. हत्येचे कारण आणि आरोपीची ओळख तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
No comments:
Post a Comment