*बारामती तालुक्यातील गॅस वितरक कामगारांच्या शोषणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; फौजदारी कारवाईची मागणी*
सोमेश्वरनगर(प्रतिनिधी):- पुणे आणि सातारा जिल्ह्यातील गॅस वितरण व्यवस्थेतील कामगारांना कामगार कायद्यानुसार मिळणारे हक्क मिळत नसल्याचा आरोप करत, सोमेश्वर नगर (ता. बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश किसनराव यादव यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी विशेष पथक नेमून चौकशी करत दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यादव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणे सातारा जिल्ह्या मधील एचपी भारत इंडियन गॅस एजन्सींमध्ये गेल्या १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना अद्यापपर्यंत नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आलेले नाही. तसेच, शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता रोखीने अत्यल्प वेतन दिले जाते.
त्यांच्या तक्रारीतील प्रमुख मुद्दे असे -
*१. भविष्य निर्वाह निधी आणि सुरक्षेचा प्रश्न:* कामगारांच्या वेतनातून पीएफ (PF), ईएसआयसी (ESIC) आणि ग्रॅच्युइटीची रक्कम कपात होत नसल्याने कामगार या लाभांपासून वंचित आहेत. तसेच सिलिंडरची वाहतूक करताना आवश्यक सुरक्षा साधने (हातमोजे, सेफ्टी शूज) पुरवली जात नसल्याचा आरोप आहे.
*२. जादा कामाचा मोबदला नाही:* कामगारांकडून दिवसाला ८ तासांपेक्षा जास्त काम करून घेतले जाते, मात्र त्याचा अतिरिक्त मोबदला (ओव्हरटाइम) दिला जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
*३. तपासणी यंत्रणेवर आरोप:* गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर यांच्याकडे वितरकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना, ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यादव यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची कामगार विभागाच्या विशेष पथकामार्फत चौकशी करून संबंधित वितरक आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे लेखी पत्र प्रसिद्धीस दिले आहे.
याबाबत संबंधित गॅस एजन्सी आणि सेल्स विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल.
No comments:
Post a Comment