अवैध धंद्यांविरुद्ध बारामती शहर पोलिसांची सातत्यपूर्ण कारवाई; सलग दोन दिवस अवैध दारू विक्रीवर छापे* “माहिती द्या, ओळख गोपनीय ठेवली जाईल;अवैध धंद्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई निश्चित” - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 20, 2026

अवैध धंद्यांविरुद्ध बारामती शहर पोलिसांची सातत्यपूर्ण कारवाई; सलग दोन दिवस अवैध दारू विक्रीवर छापे* “माहिती द्या, ओळख गोपनीय ठेवली जाईल;अवैध धंद्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई निश्चित”

अवैध धंद्यांविरुद्ध बारामती शहर पोलिसांची सातत्यपूर्ण कारवाई; सलग दोन दिवस अवैध दारू विक्रीवर छापे* “माहिती द्या, ओळख गोपनीय ठेवली जाईल;अवैध धंद्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई निश्चित”
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी दारू, दारू गुत्ते, बेकायदेशीर ताडी विक्री, मटका-जुगार, चक्री, अमली पदार्थांची विक्री तसेच इतर समाजविघातक व बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीची खातरजमा करून सलग दोन दिवस स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या आहेत.

दि. 19/09/2026 रोजी सायंकाळी 17.35 वा. बारामती शहर हद्दीतील बारामती-इंदापूर रोड, बांदलवाडी येथे बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसह छापा टाकला. फिर्यादीनुसार आरोपी लक्ष्मण बापु जोशी, वय 65 वर्षे, रा. बांदलवाडी, ता. बारामती, जि. पुणे याच्या ताब्यातून ‘टँगो पंच’ नावाच्या 90 मिली मापाच्या 18 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या, एकूण किंमत ₹720/- मिळून आल्या. सदर मुद्देमाल पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 394/2026, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सागर उत्तम जामदार, ब.नं. 2820 आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, ब.नं. 2307 करीत आहेत.

तसेच दि. 18/09/2026 रोजी सायंकाळी 17.35 वा. मौजे जळोची गावच्या हद्दीत बैलबाजाराच्या कडेला पत्र्याच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीररीत्या विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत फिर्यादीनुसार आरोपी रंजना सोमनाथ कुदळे, वय 45 वर्षे, रा. जळोची, बारामती, ता. बारामती, जि. पुणे हिच्या ताब्यातून एका पांढऱ्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये अंदाजे 10 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, किंमत ₹1,000/- मिळून आली. आवश्यक नमुना घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 389/2026, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कैलास सिताप आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, ब.नं. 2307 करीत आहेत.

सदर कारवाया मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम, प्रभारी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनीषा ओमासे आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. कारवाईमध्ये तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक श्री. सर्जेराव पुजारी आणि तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.

बारामती शहर पोलीस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, परिसरात अवैध गावठी दारू तयार करणे किंवा विक्री करणे, दारू गुत्ते चालविणे, बेकायदेशीर ताडी विक्री, मटका-जुगार किंवा चक्री, नारकोटिक्स अथवा अमली पदार्थांची विक्री, अन्न व औषधांमध्ये भेसळ, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार, शाळा-महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, शाळा-महाविद्यालय परिसरातील रोड रोमिओ तसेच महिला किंवा विद्यार्थिनींची छेडछाड यापैकी कोणताही प्रकार निदर्शनास आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

नागरिकांनी अशा प्रकारची माहिती डायल 112, बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी. परिस्थिती सुरक्षित असल्यासच फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपातील पुरावा उपलब्ध करून द्यावा; स्वतःचा जीव धोक्यात घालू नये किंवा संबंधित व्यक्तींशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख शक्य तितकी गोपनीय ठेवण्यात येईल.

बारामती शहर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्धची कारवाई ही एखाद्या एका दिवसापुरती मर्यादित नसून विश्वासार्ह माहिती, स्थानिक माहिती यंत्रणा, पेट्रोलिंग आणि तपास पथकाच्या माध्यमातून सातत्याने सुरू राहणार आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने समाजविघातक व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालून अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायद्याचा आदर करणारी बारामती घडविण्याचा बारामती शहर पोलिसांचा प्रयत्न आहे.

*“अवैध धंद्यांना आश्रय नाही; माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई निश्चित.”* 

*“जागरूक नागरिक आणि सतर्क पोलीस — सुरक्षित बारामतीची मजबूत भागीदारी.”* 

बारामती शहर पोलीस स्टेशन, 
पुणे ग्रामीण

No comments:

Post a Comment