बारामती सत्र न्यायालयाचा दणका: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी बापाला जन्मठेप; पीडितेला ५ लाखांची भरपाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 18, 2026

बारामती सत्र न्यायालयाचा दणका: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी बापाला जन्मठेप; पीडितेला ५ लाखांची भरपाई..

*बारामती सत्र न्यायालयाचा दणका: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी बापाला जन्मठेप; पीडितेला ५ लाखांची भरपाई*
*एडवोकेट अमोल सोनवणे यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे सहआरोपी सावत्र आई निर्दोष मुक्त*

बारामती | प्रतिनिधी :-अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एका नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडित मुलीला ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात विशेष बाब म्हणजे याच गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या सावत्र आईची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून, एडवोकेट अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद निर्णायक ठरला.

या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला.

*वीटभट्टीवर घडला होता संतापजनक प्रकार*

सन २०२२ मध्ये हा आरोपी आपली अल्पवयीन मुलगी आणि पत्नीला घेऊन वीटभट्टीवर कामासाठी आला होता. २७ डिसेंबर २०२२ पासून त्याने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप होता. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. पीडिता गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वीटभट्टी मालकाच्या पत्नीने तिच्या नातेवाईकांना माहिती दिली आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात सावत्र आईनेही धमकी देऊन गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. त्यानंतर तिला अटक करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

*एडवोकेट अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक*

या खटल्यात आरोपी क्र. २ म्हणजेच सावत्र आईच्या वतीने एडवोकेट अमोल सोनवणे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.

"एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप असला तरी त्याची गुन्हेगारी जबाबदारी ही केवळ कायदेशीर आणि ठोस पुराव्यांच्या आधारेच सिद्ध झाली पाहिजे," या महत्वपूर्ण कायदेशीर तत्त्वावर त्यांनी आपला लेखी व तोंडी युक्तिवाद केला. साक्षीदारांच्या उलटतपासणीतून त्यांनी अनेक महत्वाच्या बाबी न्यायालयासमोर आणल्या. प्रत्येक आरोपीची भूमिका स्वतंत्रपणे तपासली जावी, असा आग्रह त्यांनी धरला.

दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि १२ साक्षीदारांच्या साक्षी विचारात घेऊन न्यायालयाने सावत्र आईची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.

*न्यायालयाचा कठोर संदेश*

मुख्य आरोपीला जन्मठेप सुनावताना न्यायालयाने पीडितेला ५ लाखांची भरपाई देण्याचे आदेश देऊन एक कठोर संदेश दिला आहे.

या खटल्यात एडवोकेट अमोल सोनवणे यांना एडवोकेट अविनाश जाधव, रितिक गायकवाड, राजरत्न ताकतोडे, वैभव झगडे, राहुल गिरमे, सागर खरात, एडवोकेट रवींद्र सोनवणे आणि लीगल एड पॅनेलचे एडवोकेट सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.

या निकालामुळे गंभीर गुन्ह्यातही प्रत्येक आरोपीविरुद्धचे पुरावे स्वतंत्रपणे तपासणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

No comments:

Post a Comment