पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात- उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सूचना..
*अजितदादांच्या दुष्काळातील पाणी नियोजनाच्या धर्तीवर काम करा; बैठकीत मागणी*
*पुणे जिल्ह्यातील पाणी नियोजनाचा आढावा; पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या सूचना*
पुणे | विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आज कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पाणी उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई आणि आगामी काळातील पाणी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच शेती आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचे योग्य नियोजन करावे, उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा आणि संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करताना पुणे महानगरपालिकेने उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून प्रभावी नियोजन करावे. तसेच पुणे महानगरपालिकेला १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीत लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुष्काळाच्या काळातील पाणी नियोजनाच्या कार्याची उपस्थितांनी आठवण केली. अजितदादा ज्या पद्धतीने दुष्काळी परिस्थितीत नियोजन करायचे, त्याच धर्तीवर पाणी व्यवस्थापन करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावर त्यांनी याबाबत माहिती घेऊन त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
No comments:
Post a Comment