मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व स्विफ्ट कारसह ₹२,२६,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त; आरोपीस अटक!*
*प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर अग्निशस्त्राविरुद्ध धाडसी कारवाई; संभाव्य गंभीर गुन्ह्याचा धोका रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश!*
बारामती, दि. २३ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदानाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून तपास पथकाने बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयिताविरुद्ध धडक कारवाई करून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व स्विफ्ट कार असा एकूण ₹२,२६,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी २०.०० वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आदित्य शेलार, रा. आमराई, बारामती हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्रमांक MH 12 UK 0072 मधून टी. सी. कॉलेज परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून फिरत असून, त्याच्याकडून काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनीषा ओमासे यांनी स्वतः पोलीस पथकाचे नेतृत्व करून, आवश्यक खबरदारीसह संशयिताचा शोध घेण्यासाठी रात्री २०.१५ वाजता पथकासह प्रस्थान केले.
सदर पथकाने टी. सी. कॉलेज परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत असताना रात्री २०.३५ वाजण्याच्या सुमारास आठ नंबर ग्राउंडजवळील मोरया पॅलेस इमारतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक MH 12 UK 0072 संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे आढळून आले. वाहनाच्या चालक सीटवर आदित्य शेलार हा बसलेला होता. दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता चालकाच्या सीटच्या बाजूस पुढील भागात एक लोखंडी देशी बनावटीचे गावठी पिस्टल व त्याच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. त्यानंतर संबंधित इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगावरील लालसर गुलाबी रंगाच्या जॅकेटच्या उजव्या खिशामध्ये आणखी दोन जिवंत काडतुसे मिळून आली. संबंधित इसमास अग्निशस्त्र बाळगण्याच्या वैध परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे सांगितले.
या कारवाईमध्ये ₹२५,०००/- किमतीचे एक गावठी पिस्टल, ₹१,२००/- किमतीची तीन जिवंत काडतुसे आणि ₹२,००,०००/- किमतीची लाल रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार, असा एकूण ₹२,२६,२००/- (अक्षरी रुपये दोन लाख सव्वीस हजार दोनशे फक्त) किमतीचा मुद्देमाल दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २०.४५ ते २१.१० वाजण्याच्या दरम्यान दोन पंचांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला.
सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७३/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ चे कलम ३ सह २५(१-ब)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आदित्य शेलार, रा. आमराई, बारामती यास कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक विचारणेदरम्यान आरोपी आदित्य शेलार याने सदर अग्निशस्त्र मयूर मोरे, रा. मेडद, ता. बारामती याच्याकडून मिळाल्याचे सांगितले असून, त्याअनुषंगाने अग्निशस्त्राचा मूळ स्रोत, संभाव्य बेकायदेशीर पुरवठा, हस्तांतरण व संबंधित व्यक्तींचा सहभाग याबाबत स्वतंत्र पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव विष्णू क्षीरसागर, बक्कल क्रमांक ३७५ हे करीत आहेत.
मतदानाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध झालेली ही कारवाई कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनीषा ओमासे यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी जाऊन केलेले प्रत्यक्ष नेतृत्व, पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांचा समन्वय आणि तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांची तत्परता यामुळे बेकायदेशीर अग्निशस्त्राचा संभाव्य गैरवापर रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच संभाव्य गंभीर गुन्ह्याचा धोका लक्षात येताच वेळीच हस्तक्षेप करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हा या कारवाईचा महत्त्वाचा पैलू आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून पार पडली. या कारवाईत पोलीस हवालदार क्षीरसागर, पोलीस शिपाई कवितके, पोलीस शिपाई अक्षय सिताफ व पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
बारामती शहर परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या, त्यांचा पुरवठा करणाऱ्या अथवा सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा स्वरूपाच्या संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
नागरिकांची सुरक्षितता, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बारामती शहर पोलीस सदैव कटिबद्ध आहेत.
पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण
No comments:
Post a Comment