*बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर केले आरोप*
बारामती:- सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल’चा जाहीरनामा आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्याच्या मुद्द्यावर जय पवार यांनी भाष्य केले.
जय पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी मला पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अजितदादांचे नाव आणि छायाचित्र परवानगीशिवाय वापरू नये, असे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले होते.”
“मात्र, काल त्यांनी सुनेत्रावहिनींचा व्हिडिओ वापरून आपल्या पॅनेलचा प्रचार केला. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे,” असे जय पवार यांनी स्पष्ट केले.
“जगताप यांनी अजितदादांचा आवाज असलेला व्हिडिओदेखील वापरला आहे. त्याबाबतही कारवाई करण्यात येईल. अजितदादांचे नाव आणि छायाचित्र परवानगीशिवाय वापरू नये, असे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याची माहिती आज सायंकाळपर्यंत जाहीर केली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
जगताप यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या इतर व्यक्तींवर कारवाई केली जाणार नसल्याचेही जय पवार यांनी स्पष्ट केले. “ही परिस्थिती एका व्यक्तीमुळे निर्माण झाली आहे. हे सर्व जगताप यांच्यामुळे झाले आहे,” असे ते म्हणाले.
‘अजितदादांच्या कार्यपद्धतीने कारखाना चालवणार’
अजितदादांनी अनेक वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. त्याच कार्यपद्धतीने सोमेश्वर कारखाना चालवला जाईल, असे जय पवार यांनी सांगितले.
“यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नाही. आमचे लक्ष कारखाना योग्य पद्धतीने चालवण्यावर आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या कथित सहभागाबाबत जय पवार म्हणाले…
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत भाजपचा सहभाग असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जय पवार म्हणाले, “ही कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक नाही. त्यामुळे याकडे त्या पद्धतीने पाहिले जाऊ नये, असे मला वाटते.”
पॅनेल निश्चित करण्यापूर्वी पुरुषोत्तम जगताप यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती, असेही त्यांनी सांगितले.
“२८ तारखेला पुरुषोत्तम जगताप आमच्याकडे आले आणि त्यांनी १६ नावे दिली. या नावांबाबत आम्ही सुनेत्रावहिनींसोबत चर्चा केली. त्यानंतर २९ तारखेला रात्री साधारण दोन वाजता ते आमच्याकडे आले. त्यावेळी सुनेत्रावहिनीही उपस्थित होत्या. त्यानंतर नवीन पॅनेल तयार करून अंतिम करण्यात आले,” असे जय पवार यांनी सांगितले.
“सध्या पुरुषोत्तम जगताप यांचे दौरे आणि प्रचाराची पद्धत पाहता, त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच हा काहीतरी वेगळा प्लॅन असावा, असे मला वाटते,” असेही ते म्हणाले.
आमचे पॅनेल सर्वसमावेशक असल्याचे सांगत जय पवार म्हणाले, “यामध्ये उमेश पाटील यांची कोणतीही भूमिका नाही. सुनेत्रावहिनी आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हे पॅनेल तयार केले आहे.”
‘चूक झाली तर जबाबदारी आमची’
कारखाना कार्यक्षमपणे चालवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जय पवार यांनी सांगितले.
“काही चूक झाली तर सुनेत्रावहिनी आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारची चूक होऊ देणार नाही. काही घडलेच तर त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारू,” असे जय पवार म्हणाले.
‘अजितदादांवरील जनतेचे प्रेम आजही दिसते’
सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजितदादांवरील जनतेचे प्रेम आणि आपुलकी आजही स्पष्टपणे दिसून येत असल्याचे जय पवार यांनी सांगितले.
“सध्याचा प्रचार पाहिला तर प्रत्येक ठिकाणी दादांवरील जनतेचे प्रेम दिसत आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षाही यावेळी अधिक लोक प्रचारात सहभागी होत आहेत. सर्वत्र लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत आहे,” असे ते म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीत सर्वांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. त्याचवेळी हेच लोक आमच्यासोबतही होते,” असे जय पवार यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment