*मुलीच्या स्मृती प्रित्यर्थ पित्याने घेतले रक्तदान शिबिर... जपले मानवतेचे नाते*
माळेगाव बुद्रुक:-माळेगाव बुद्रुक ता. बारामती येथील शरीफ शेख यांची कन्या जैनब हिचा वयाच्या बाराव्या वर्षी सिकल सेल नावाच्या आजाराने मृत्यू झाला. त्यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत वर्गणी द्वारे पैशाची जुळवाजुळव करून जैनबवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. परंतु दुर्दैवाने तिचा त्यानंतर काही दिवसात मृत्यू झाला.
आपल्या लाडक्या कन्येच्या मृत्यूने शरीफ शेख हे अत्यंत दुःखी झाले. परंतु स्वतःचं दुःख बाजूला सारून त्यांनी मुलीच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 15/11/2026 रोजी माळेगाव बुद्रुक येथील राजहंस संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नितीन दादा शेंडे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी नाना होळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी माळेगाव येथील युवा कार्यकर्ते रविराज तावरे यांनी सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून शिबिरास प्रारंभ केला.
कार्यक्रमास माळेगाव कारखान्याचे संचालक शिवराज जाधवराव, माळेगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा वृषाली राहुल तावरे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद जाधव, स्वप्नपूर्ती अभ्यासिकेचे प्रमुख रियाज शेख, मुरली खरात यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नितीन शेंडे म्हणाले, मृत्यू हे एक सत्य आहे परंतु एवढ्या लहान वयात आणि बापाच्या समोर एका लेकीचा मृत्यू होणे ही गोष्टच मनाला चटका लावून जाणारी आहे. परंतु यातूनही शेख कुटुंबाने स्वतःला सावरत आपल्या लाडक्या कन्येच्या स्मृती प्रित्यर्थ घेतलेले रक्तदान शिबिर हे प्रशंसनीय आहे.
शिबिरात एकूण *123 बॅग रक्त* संकलित करण्यात आले. शिबिर यशस्वी होण्याकरिता संकल्प इन्स्टिट्यूट माळेगाव बुद्रुक व युवा चेतना सामाजिक संस्था बारामती यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment