'बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६' चा तीन दिवसीय क्रीडा महोत्सव;दि.२७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान बारामतीत धावण्याचा उत्सव; ७,२७० धावपटूंचा सहभाग, १० लाखांची पारितोषिके..
बारामती :-बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६ बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित चौथे पर्व
स्व. अजितदादांना समर्पित | NECC (नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी) आणि व्हेंकोब चिकन प्रस्तुत 'बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६' चा तीन दिवसीय क्रीडा महोत्सव !
२७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान बारामतीत धावण्याचा उत्सव; ७,२७० धावपटूंचा सहभाग, १० लाखांची पारितोषिके आणि ३० स्टॉल्सचा भव्य स्पोर्ट्स एक्स्पो २७ ते २९ नोव्हेंबर २०२६.
७,२७० धावपटू १० लाख रुपये ३० स्टॉल्स असणार आहे,
क्रीडा क्षेत्रात बारामतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक भक्कम करणाऱ्या 'इंडियाज्
आयकॉनिक बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६' च्या चौथ्या पर्वाचे आयोजन यंदा तीन दिवसीय भव्य क्रीडा महोत्सवाच्या स्वरूपात
करण्यात येणार आहे. रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी मुख्य मॅरेथॉन स्पर्धा रंगणार असून, त्याआधी २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी
स्पोर्ट्स एक्स्पो, बिब डिस्ट्रीब्यूशन, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची मेजवानी बारामतीकरांना
अनुभवता येणार आहे. या संपूर्ण आयोजनाची माहिती बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि भक्कम पाठिंब्यातून सुरू झालेली ही मॅरेथॉन यंदा त्यांना समर्पित करण्यात आली आहे. अजितदादांच्या कार्याचा गौरव ही यंदाच्या मॅरेथॉनची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत क्रीडा, आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक सहभागाचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
*दि.२७ नोव्हेंबरला खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते एक्स्पोचे उद्घाटन.*
मॅरेथॉन महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते
स्पोर्ट्स एक्स्पो आणि बिब डिस्ट्रीब्यूशनच्या उद्घाटनाने होणार आहे. या एक्स्पोमध्ये तब्बल ३० स्टॉल्स उभारण्यात येणार
असून, विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा ब्रँड्सची उत्पादने बारामतीकरांसह सहभागी धावपटूंना पाहण्याची, अनुभवण्याची आणि
खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. क्रीडाप्रेमींसाठी हा एक्स्पो विशेष आकर्षण ठरणार आहे.शुक्रवार आणि शनिवार, दि. २७ व २८ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पोर्ट्स एक्स्पो आणि
बिब डिस्ट्रीब्यूशन सुरू राहणार आहे. या काळात मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना आपले बिब आणि स्पर्धेचे किट वितरित करण्यात येणार आहे.
*एक्स्पोसह गेम्स, मॅजिक शो आणि मनोरंजनाची मेजवानी*
मॅरेथॉन हा केवळ धावण्याचा कार्यक्रम न राहता संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी अनुभव ठरावा, या उद्देशाने दोन्ही दिवस
विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध गेम्स, मॅजिक शो, फूड स्टॉल्स आणि
मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम असणार आहेत. त्यामुळे सर्वांना क्रीडा, खरेदी, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाचा एकत्रित अनुभव
घेता येणार आहे.
*दि.२९ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते मुख्य मॅरेथॉनचा शुभारंभ;चार विभागात स्पर्धा*
रविवार, दि. २९ नोव्हेंबर हा मॅरेथॉनचा मुख्य दिवस असणार आहे. उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख
उपस्थितीत रेल्वे स्टेशन ग्राउंड, बारामती येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून, चार विविध अंतरांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
*४२ किमी फुल मॅरेथॉन पहाटे ४:०० वाजता रेल्वे स्टेशन ग्राउंड,बारामती.*
*२१ किमी हाफ मॅरेथॉन सकाळी ६:०० वाजता रेल्वे स्टेशन ग्राउंड,बारामती*
*१० किमी रन सकाळी ६:३० वाजता रेल्वे स्टेशन ग्राउंड,बारामती*
*५ किमी फन रन सकाळी ७:५५ वाजता रेल्वे स्टेशन ग्राउंड, बारामती*
अनुभवी धावपटूंपासून नवोदित धावपटू, युवक-युवती, कुटुंबीय आणि फिटनेसप्रेमी नागरिकांपर्यंत सर्वांना या स्पर्धेत सहभागी
होता यावे, यासाठी चार प्रकारांची रचना करण्यात आली आहे.
*१० लाखांची पारितोषिके; शाळा, महाविद्यालये आणि रनिंग ग्रुप्सचा विशेष सन्मान*
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ४२ किमी, २१ किमी, १० किमी. आणि ५
किमी अशा चारही प्रकारांमध्ये विविध वयोगटांनुसार पारितोषिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम ३
धावपटूंचा गौरव केला जाणार आहे.
मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि रनिंग ग्रुप्स यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सर्वाधिक धावपटूंची नोंदणी करणाऱ्या संस्थांना आणि समूहांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. यामुळे शैक्षणिक संस्था, युवक आणि विविध धावपटू समूहांमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.
*आंतरराष्ट्रीय दर्जा आणि धावपटूंसाठी विशेष सुविधा*
वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या निकषांनुसार प्रमाणित व मोजलेला मार्ग आणि AIMS च्या सहकार्यामुळे बारामती पॉवर मॅरेथॉनला
आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धावपटूंच्या सुरक्षिततेला आणि अनुभवाला सर्वोच्च प्राधान्य देत मार्गावर
हायड्रेशन सपोर्ट, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन मदत, स्वयंसेवकांची फळी, उच्च दर्जाचे टी-शर्ट, आकर्षक फिनिशर मेडल्स
आणि पौष्टिक नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे . सन २०२३ मध्ये अवघ्या ७२७ धावपटूंच्या सहभागाने सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये यंदा तब्बल ७,२७० धावपटूंनी नोंदणी केली आहे. अवघ्या चार वर्षांत धावपटूंच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ ही
बारामतीच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.बारामती पॉवर मॅरेथॉनच्या माध्यमातून बारामतीमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, फिटनेस संस्कृती आणि क्रीडाप्रेमींचे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर या तीन दिवसीय महोत्सवामुळे बारामतीच्या पर्यटन, आदरातिथ्य,स्थानिक व्यवसाय आणि आर्थिक उलाढाल यांना चालना मिळणार आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सतीश ननवरे, बारामती पॉवर मॅरेथॉनचे चेअरमन ज्ञानेश्वर(मामा)जगताप, लक्ष्मण भोसले, समीर ढोले व इतर सहकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment