मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा-खा. सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा-खा. सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा*
*खा. सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
पुणे, दि. १ (प्रतिनिधी) - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे तिच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 
मराठी भाषा दिन अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या मागणीच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न आणि रंगनाथ पठारे समितीच्या अहवालाचा दाखलाही दिला आहे. आपण सर्वांनी मिळून हा विषय पूर्णत्वास नेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे. 
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली १४ वर्षे राज्यातील साहित्यिक तसेच राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासनस्तरावरुन प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यासंदर्भातील अहवाल सादर करूनही आता सात वर्षे उलटली आहेत. याशिवाय दरवर्षी मराठी साहित्य संमेलनासह अन्य कुठल्या ना कुठल्या साहित्यिक मेळाव्यात, बैठकीत, चर्चासत्रात हा विषय घेऊन शासनापर्यंत तो पोहोचवला जात असतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास तिला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळेल. देशातील तब्बल साडेचारशे विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि तिच्यातील ज्ञान आत्मसात करणे शक्य होईल. याशिवाय अन्य अनेक गोष्टींशी संबंधीत मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे सोपे होईल.
 या सगळ्या बाबींचा विचार करून केंद्र सरकारकडे हा विषय मांडणे अगत्याचे आहे. त्यासाठी राज्याचे प्रमुख या नात्याने आपण पाठपुरावा करावा. त्यासाठी आम्ही आणि आपले संपूर्ण राज्य आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीसुद्धा सुप्रिया सुळे यांनी या पत्रातून दिली आहे.

No comments:

Post a Comment