यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१ जाहीर...पाच क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या १४ युवक-युवतींची निवड ! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 22, 2022

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१ जाहीर...पाच क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या १४ युवक-युवतींची निवड !

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१ जाहीर...पाच क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या १४ युवक-युवतींची निवड ! 

मुंबई (दि.२२) : यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१’ ची घोषणा करण्यात आली आहे.चव्हाण सेंटरच्या माध्यमातून युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता,रंगमंचीय कलाविष्कार व साहित्य या क्षेत्रांतील विविध गुणवंत युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.   

या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण जागतिक पुस्तक दिनी शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत  रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई -२१ येथे कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजारांचा धनादेश,सन्मानचिन्ह असे असणार आहे. 

यंदाचा २०२१ सालाचे युवा क्रीडा पुरस्कार आंतरराष्ट्रीय क्रीडापटू राही सरनोबत (नेमबाज,कोल्हापूर),स्वरूप उन्हाळकर (पॅरालॉंपिक,कोल्हापूर),अविनाश साबळे(धावपटू,बीड) यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडापटू अंजली भागवत,क्रीडा पत्रकार शैलेश नागवेकर,संजय घारपुरे,विजय साळवी व शंतनू सुगवेकर यांचा समावेश होता. 

सामाजिक युवा पुरस्कारात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छाया भोसले (श्रीगोंदा,अहमदनगर) व रवी चौधरी (औरंगाबाद) यांची निवड करण्यात आली आहे.या निवड समितीमध्ये अनिकेत आमटे,प्रा.हमीद दाभोळकर,दीपक नागरगोजे, मुमताज शेख व दीप्ती राऊत यांचा समावेश होता. 

महाराष्ट्राला कला-साहित्याची मोठी परंपरा आहे. अनेक कलांचे उगमस्थान असलेल्या या भूमीतील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) सादर करणाऱ्या युवक-युवतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नाट्य विभागात अक्षय शिंपी (मुंबई),शास्त्रीय नृत्य विभागात स्वरदा भावे (पुणे), लोककला विभागात शुभम अवधूत,पोवाडा (सांगली), तर शास्त्रीय संगीत विभागात यशवंत वैष्णव,तबलावादक (मुंबई) या चौघांना जाहीर झाले आहे.या पुरस्काराच्या निवड समितीत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे,ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे,प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनिस,लोककला अकादमीचे प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे व प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा समावेश होता. 

मराठी भाषेत मागील पाच वर्षांत साहित्यकृतींचे लिखाण करणाऱ्या युवक व युवतींना साहित्य युवा पुरस्कार २०२१ देऊन गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कारांमध्ये सोलापूरच्या ऐश्वर्या रेवाडकर (पुस्तक : बिजापूर डायरी) व बार्शी येथील ज्ञानेश्वर जाधवर (पुस्तक : येसन) यांची निवड करण्यात आली आहे. 
या निवड समितीत प्रा.प्रज्ञा दया पवार,सोनाली नवांगुळ,प्रा.ऐश्वर्य पाटेकर,डॉ.कैलास अंभूरे व बालाजी मदन इंगळे यांचा समावेश होता. 

आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मिनाक्षी वालके (चंद्रपूर), अश्विन पावडे (औरंगाबाद/अकोला) व सोनाली गराडे (नाशिक) या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.या निवड समितीमध्ये आनंद अवधानी,सुनील किर्दक,दीपाली चांडक व मनोज हाडवळे यांचा समावेश होता.

या सर्व पुरस्कारासाठी अर्ज स्वीकृती व अंतिम निवड प्रक्रिये पर्यंतचे सर्व कामकाज नवमहाराष्ट्र युवा अभियानचे संघटक नीलेश राऊत व संतोष मेकाले यांनी यशस्वीपणे पार पाडले.  


No comments:

Post a Comment