नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात - आनंद भोईटे
सोमेश्वरनगर(हेमंत गडकरी):-
नागरिकांनी न घाबरता निर्भयपणे आपल्या तक्रारी दाखल कराव्यात. प्रसंगी पोलिसांविरोधात तक्रार असल्यास त्यावरही कारवाई करण्यात येईल असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी व्यक्त केले.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या तक्रार निवारण दिनानिमित्ताने ते बोलत होते. राज्याचे पोलीस महानिरीक्षक व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या तब्बल ७५ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये जमिनीच्या बांधांचे जास्त वाद होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी अर्जदार व गैर अर्जदार यांच्याशी सकारात्मक संवाद साधत तोडगे काढले. काही प्रकरणात पोलीसांना स्थळ पाहणी करून कारवाई करण्याचा सूचना दिल्या. घरगुती वादाच्या प्रकरणात महिला समुपदेशन कक्षाची मदत घेण्यात आली.
यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी ही अनेक तक्रारदारांचे समुपदेशन करत जुने तंटे यशस्वीपणे मिटवले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, सलीम शेख व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment