वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात सूट देण्याची मागणी करणार महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना ग्वाही..
परभणी (प्रतिनिधी):- परभणी लोकसभा मतदारसंघातून आपण विजयी होवून लोकसभेत गेल्यानंतर वृत्तपत्र खरेदी करणार्यांना उत्पन्न करात वार्षिक 5 हजार रुपये सूट द्यावी, ही पत्रकार संघाची मागणी संसदेत प्रभावी मांडू, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना दिली. स्थानिक पातळीवरील छोटी वर्तमानपत्रे सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा ओहापोह करतात. स्थानिक प्रशासनाला समस्या लक्षात आणून देतात. त्यामुळे या वृत्तपत्रांना आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे यासाठी पत्रकार संघाची मागणी आपण लावून धरू असेही त्यांनी स्पष्ट केले.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची मानवत येथे बुधवारी (दि.17) रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी भेट घेवून केंद्र सरकारने वृत्तपत्रांना आर्थिक मदत व्हावी यासाठी वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी याबाबतची भूमिका सांगितली. जानकर यांनी याबाबत सविस्तर चर्चा करून महाराष्ट्रासह देशभरातील छोट्या मोठ्या वृत्तपत्रांचे प्रश्न, पत्रकारांची आर्थिक परिस्थिती याबाबत माहिती घेतली आणि पत्रकार संघाने केंद्र सरकारकडे केलेली मागणी रास्त आहे. लोकसभेत गेल्यानंतर आपण या मागणीसाठी सुरूवातीलाच सभागृहात आवाज उठवू अशी ग्वाही दिली. जिल्हा, तालुका, गावपातळीवरील छोटी वर्तमानपत्रे सार्वजनिक समस्यांचा ओहापोह करतात. सर्वसामान्य माणसांच्या समस्यांना स्थानिक प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे छोटी वृत्तपत्रे जगली पाहिजेत ही पत्रकार संघाची भूमिका लोकशाहीला अधिक बळकट करणारी आहे. पत्रकार संघाने केलेली मागणी व्यवहारी असून सरकार सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, राज्य कार्यकारणी सदस्य बाबासाहेब देशमाने यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न-वसंत मुंडे
देशभरात पत्रकारांना काही प्रश्न असतात असा विचारच सरकारमध्ये असलेल्या सत्ताधिशांना येत नाही. राज्यकर्तेही पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. कोरोनानंतर वर्तमानपत्र व्यवसाय आणि पत्रकारांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसायाला उर्जितावस्था मिळावी यासाठी पत्रकार संघाने लोकसभा निवडणूकीच्या मैदानात असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांना केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात वार्षिक पाच हजाराची सुट द्यावी या मागणीचे निवेदन देवून पाठींबा मिळवण्यास सुरूवात केली आहे. उमेदवारांनीही मागणीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या मैदानात सर्वसामान्यांच्या प्रश्नाबरोबरच पत्रकारांच्या प्रश्नाकडेही आता लक्ष वेधले जात असल्याने आगामी काळात याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा वसंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment