*प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत;मात्र चुकीच्या पद्धतीने बातमी देण्यात आली - अविनाश आदिक*
*प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनिल तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पुढेही असणार आहेत - उमेश पाटील*
मुंबई दि. १६ मे - दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न पत्रकाराने केला. मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवारपर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीच्या कार्यालयात बसायला जागा सिमित असल्याने अध्यक्षांच्या केबिनमध्येच प्रफुल पटेल किंवा सुनिल तटकरे बसत होते आणि आताही त्यांचे बसण्याचे ठिकाण तेच असणार आहे. त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हते. त्यामुळे आताही तेच दालन आहे हे त्या पत्रकारांना सांगितले मात्र त्यांनी इकडून - तिकडून मिळालेल्या माहितीनुसार बातमी बनवली असेही अविनाश आदिक म्हणाले.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. त्याची बातमी 'लोकसत्ता' मध्ये आली आहे याबद्दल खुलासा करण्यासाठी अविनाश आदिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
अजितदादा पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय सरचिटणीस होतो. त्यावेळी प्रफुल पटेल व दादांनी माझ्यावर दिल्लीच्या कार्यालयाची जबाबदारी दिली होती. नियमित आठवड्यातून तीन दिवस पक्षासंबधित जी काही कामे असायची ती करत होतो आणि देशभरातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. दादांच्या निधनानंतर म्हणजे ऑक्टोबर ते कालपर्यंत (शुक्रवार) मी दिल्ली कार्यालयाला भेट दिली नव्हती. नवीन यादीत राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे आणि माझ्याकडे जुनीच दिल्ली कार्यालयाची जबाबदारी आहे. त्याचा भाग म्हणूनच मी दिल्लीला काल (शुक्रवार) गेलो होतो. तिथे आलेल्या कार्यकर्त्यांना भेटलो. दिवसभर मी कार्यालयात होतो असेही अविनाश आदिक यांनी सांगितले.
आज छापून आलेल्या बातमीच्या आधारे आमच्या हितशत्रूंनी त्याचं भांडवल करुन त्या घटनेला अजून आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी याला आळा बसावा म्हणून कायदेशीर सल्ला घेत आहे. विशेष म्हणजे त्या बातमीत स्पष्टपणे उल्लेख असल्याने याबाबत आज पत्रकार परिषदेत खुलासा केल्याचे अविनाश आदिक यांनी सांगितले आहे.
निवडणुक आयोगाला दिलेल्या पत्रावरून माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. त्याबाबत माध्यमांशी संवाद साधण्याचा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी केल्या म्हणून आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली.
निवडणुक आयोगाकडे देण्यात आलेल्या वर्किंग कमिटी आणि बेरर कमिटी पत्राबाबत जे काही माध्यमांमध्ये उलटसुलट येत आहे त्याबाबत योग्य ती माहिती उमेश पाटील यांनी माध्यमांना दिली.
पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या पदाचा उल्लेख त्या पत्रात राज्यसभा गटनेते असा असला तरी ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि राहतील आणि सुनिल तटकरे यांचाही पदाचा उल्लेख नसला तरी ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहतील असा स्पष्ट खुलासा उमेश पाटील यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे न्यायालयात जे कामकाज सुरू आहे. ते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर तात्काळ काही कागदपत्रे देण्याच्या वकिलांच्या सूचना होत्या. त्यामुळे ही तात्पुरती यादी करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्किंग कमिटी ही सर्वोच्च आहे. याच कमिटीला बेरर कमिटी स्थापन करण्याची आणि त्यातील लोकांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार आहेत असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
वर्किंग कमिटी आणि बेरर कमिटीबाबत ज्या काही उलटसुलट चर्चा सुरू आहेत त्या चर्चांना पूर्णविराम मिळावा अशी विनंती करतानाच प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेतच शिवाय सुनिल तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत हे पुन्हा एकदा उमेश पाटील यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment