मान्सूनच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जय पवार यांची प्रादेशिक हवामान केंद्राला भेट; शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 19, 2026

मान्सूनच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जय पवार यांची प्रादेशिक हवामान केंद्राला भेट; शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन..

मान्सूनच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जय पवार यांची प्रादेशिक हवामान केंद्राला भेट; शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन..
मुंबई, दि. १९ जून : महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी युवानेते जय पवार यांनी मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र (Regional Meteorological Centre - RMC) ला भेट दिली.

यावेळी Scientist–G श्री. बिक्रम सिंग यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा दिला. त्यानंतर Scientist–E डॉ. नायर, Scientist–D सौ. निथा, Scientist–C डॉ. जिस्मी आणि Meteorologist–B श्री. योगेश यांच्यासोबत सखोल चर्चा करण्यात आली.

या चर्चेदरम्यान मान्सूनच्या आगमनास होत असलेल्या विलंबामागील विविध कारणांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. यामध्ये एल निनो (El Niño) चा संभाव्य प्रभाव तसेच इतर महत्त्वाच्या हवामानविषयक घटकांवर चर्चा झाली. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुमारे २५ जूनच्या आसपास मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
राज्यातील शेतकरी वर्ग पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मान्सूनच्या विलंबाचा जलसाठे, शेती क्षेत्र आणि सर्वसामान्य जनजीवनावर थेट परिणाम होत असल्याने, या परिस्थितीचा अचूक आढावा घेणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

यावेळी जय पवार यांनी शेतकरी बांधवांना आवाहन करताना सांगितले की, राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन समाधानकारक आणि सातत्यपूर्ण पाऊस सुरू होईपर्यंत पेरणीसाठी घाई करू नये. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावेत.

यापुढेही जय पवार प्रादेशिक हवामान केंद्राशी सातत्याने संपर्कात राहून मान्सूनच्या प्रगतीविषयीची अचूक व अद्ययावत माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment