'आपले सरकार सेवा केंद्र’सुरु करण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन..
बारामती(रामायण धर्माधिकारी):- जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु करण्यासाठी बारामती तालुक्यातील ८४ गावांमधून १०७ नवीन सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
याबाबतचा जाहीरनामा, अटी-शर्ती, अर्जाचा नमुना तसेच रिक्त केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत http://www.pune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे, किमान बारावी उत्तीर्ण असणे, संगणकाचे ज्ञान असणे तसेच संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
केंद्रासाठी संगणक, इंटरनेट, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम व वीज बॅकअप आदी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास पात्रता, शैक्षणिक व संगणक ज्ञान, पायाभूत सुविधा, अनुभव आणि मुलाखत अशा विविध निकषांवर गुणांकन करून निवड केली जाणार आहे. निवड प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, निवड झालेल्या केंद्रचालकाशी प्रारंभी तीन वर्षांचा करार केला जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment