आई रागावली म्हणून मुलीची बिल्डिंग चे पाचव्या मजल्याचे टेरेस वरून उडी मारून आत्महत्या..
बारामती :-दिनांक 23/08/2026 रोजी 03:40 वा. चे सुमारास एक महिला व तिचे पती व 2-3 नातेवाईक पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी नाईट राउंड अधिकारी पोहेकॉ बापू कांबळे यांना सांगितले की, दि. 22/08/2026 रोजी रात्री 10:00 वा. चे सुमारास त्यांनी त्यांच्या मुलीला रागावले असता ती रागाने घरातून निघून गेली. सदर कुटुंब रेसिडेन्सी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहते. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने ते पोलीस ठाण्यात आले होते.
त्यावरून पोहेकॉ बापू कांबळे यांनी मुलीच्या वडिलांसह आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, परंतु मुलगी मिळून आली नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात *गुन्हा रजि. नं. 401/2026, कलम 137(2) BNS* अन्वये सकाळी 06:32 वा. गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शोध घेत असताना डायल 112 चे पोहेकॉ कृष्णा कांबळे यांना माहिती मिळाली की, रुई हद्दीतील स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मयत अवस्थेत पडलेली आहे. त्यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांना बोलावून खातरजमा केली असता, तीच हरवलेली मुलगी असल्याचे निष्पन्न झाले.
*घटनास्थळाची पाहणी व तपास :-*
सदर माहिती मिळताच महिला पोउपनि धनश्री भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
1. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक टीम व डिटेक्शन ब्रांचच्या 3 टीम्स ना पाचारण करून तपास सुरु करण्यात आला.
2. स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसवर पाहणी केली असता, टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे दिसले. पोलिसांनी स्थानिक मुलांच्या मदतीने शिडीच्या सहाय्याने टेरेसवर प्रवेश केला असता, तेथे मयत मुलीची चप्पल मिळून आली.
3. इमारतीच्या लिफ्टजवळील CCTV फुटेज तपासले असता, सदर मुलगी रात्री 09:58 वा. लिफ्टने वर गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
4. मयत मुलीच्या शरीरावर - तोंडावर खरचटल्याच्या जखमा, डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे व ती पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आली.
प्राथमिक तपास व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सदर मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
मयत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे पाठविण्यात आला आहे. पीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोउपनि धनश्री भगत करीत आहेत.अशी माहिती पोलीस निरीक्षक, नारायण पवार बारामती तालुका पोलिस ठाणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment