पतंगाचा दोर की मृत्यूचा फास? बारामतीत जीवघेण्या नायलॉन मांजावर पोलिसांचा घाव..! घराच्या आडोशाला लपवून ठेवलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; विक्रेत्यावर गुन्हा दाखल,आरोपी ताब्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

पतंगाचा दोर की मृत्यूचा फास? बारामतीत जीवघेण्या नायलॉन मांजावर पोलिसांचा घाव..! घराच्या आडोशाला लपवून ठेवलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; विक्रेत्यावर गुन्हा दाखल,आरोपी ताब्यात..

पतंगाचा दोर की मृत्यूचा फास? बारामतीत जीवघेण्या नायलॉन मांजावर पोलिसांचा घाव..! घराच्या आडोशाला लपवून ठेवलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; विक्रेत्यावर गुन्हा दाखल,आरोपी ताब्यात..
*“नायलॉन मांजा विकाल तर पोलिसांची कारवाई टळणार नाही” — बारामती शहर पोलिसांचा स्पष्ट इशारा* 

बारामती :- बारामती शहर व परिसरात प्रतिबंधित नायलॉन/सिंथेटिक मांजाची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यांविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशनने कठोर मोहीम हाती घेतली असून, दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी गुणवडी येथील वायसेवस्ती परिसरात सापळा रचून केलेल्या कारवाईत 16 नग प्रतिबंधित नायलॉन मांजाचे रिल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 335/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 व 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

पतंग उडविण्याचा आनंद काही क्षणांचा असतो; मात्र त्यासाठी वापरण्यात येणारा धारदार नायलॉन किंवा सिंथेटिक मांजा रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप नागरिकाच्या गळ्याला लागल्यास तो क्षणार्धात गंभीर दुखापत किंवा मृत्यूचे कारण ठरू शकतो. दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी हा मांजा गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे “हा केवळ पतंगाचा दोर नाही; निष्काळजी हातात तो जीवघेणा सापळा ठरू शकतो”, या भूमिकेतून बारामती शहर पोलिसांनी प्रतिबंधित मांजाविरोधात विशेष कारवाई सुरू केली आहे.

दिनांक 16/08/2026 रोजी सायंकाळी सुमारे 17.35 वाजता, मौजे गुणवडी गावच्या हद्दीतील वायसेवस्ती येथे प्रतिबंधित नायलॉन मांजाची बेकायदेशीररीत्या साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती तपास पथकास प्राप्त झाली. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने सापळा रचला. कारवाईदरम्यान ओम गणेश वायसे, वय 24 वर्षे, रा. गुणवडी वायसेवस्ती, ता. बारामती, जि. पुणे याच्या ताब्यातून प्रतिबंधित नायलॉन मांजाचे वेगवेगळ्या रंगांचे 16 नग रिल, प्रत्येकी अंदाजे 400 रुपये किमतीचे, असा एकूण 6,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

सदर कारवाईनंतर पोलीस कॉन्स्टेबल गिरीश गणपत नेवसे, ब.नं. 478 यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 335/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर तपासकामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, ब.नं. 375 करीत आहेत.

नायलॉन मांजा विक्रेत्यांनो सावधान — साठा लपवला तरी कारवाईपासून सुटका नाही!

प्रतिबंधित नायलॉन मांजा दुकानात उघडपणे विकण्याऐवजी घरातून, गोदामातून, पिशवी किंवा बॉक्समध्ये लपवून अथवा मागणीनुसार गुप्तपणे पुरविला जात असल्यास अशा विक्रीच्या पद्धतींवरही पोलिसांचे लक्ष आहे. नायलॉन मांजाच्या अवैध पुरवठा साखळीचा शोध घेऊन साठवणूक करणारे, विक्रेते, पुरवठादार तसेच ऑनलाइन माध्यमातून त्याची विक्री किंवा पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध उपलब्ध पुराव्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी 2026 मधील नायलॉन मांजासंदर्भातील प्रकरणांमध्ये या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठाने नायलॉन मांजामुळे नागरिक, पक्षी व प्राण्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यूंचा उल्लेख करून केवळ किरकोळ विक्रेते किंवा वापरकर्त्यांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि ऑनलाइन पुरवठ्याची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी सातत्यपूर्ण व गुप्त माहितीवर आधारित अंमलबजावणीची आवश्यकता अधोरेखित केली आहे.

नागपूर खंडपीठाने स्वतंत्र आदेशात नायलॉन मांजा वापरणाऱ्यास ₹25,000 आणि नायलॉन मांजाचा साठा आढळणाऱ्या विक्रेत्यास ₹2,50,000 दंडाची तरतूद केली असून प्रत्येक उल्लंघन स्वतंत्रपणे दंडनीय असल्याचे स्पष्ट केले आहे. अल्पवयीन व्यक्तीने नायलॉन मांजा वापरल्यास संबंधित दंड पालकांकडून वसूल करण्याचेही निर्देश त्या आदेशात आहेत.

त्यामुळे “मला बंदीची माहिती नव्हती”, “फक्त काही रिल ठेवले होते”, “मी स्वतः वापरत नव्हतो” किंवा “घरात ठेवले होते” अशा कारणांमुळे प्रतिबंधित नायलॉन मांजाबाबत कायदेशीर कारवाई टळेल, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. प्रत्येक प्रकरणात उपलब्ध तथ्य, पुरावे, लागू आदेश व कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

पालकांनाही आवाहन — मुलांच्या हातातील मांजा कोणता आहे, याकडे लक्ष द्या

पालकांनी आपल्या मुलांना पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन/सिंथेटिक मांजा उपलब्ध करून देऊ नये आणि त्यांच्याकडून अशा मांजाचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. नायलॉन मांजाचा वापर करणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास दंड पालकांकडून वसूल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

बारामती शहर पोलिसांचे नागरिकांना स्पष्ट आवाहन आहे — पतंग उडवा, आनंद साजरा करा; पण कोणाच्याही गळ्यावर, जीवावर किंवा पक्ष्यांच्या पंखांवर मृत्यूचा मांजा सोडू नका. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत इंगवले यांच्या नेतृत्वात तपास पथकातील पोलीस हवालदार श्री. ज्ञानदेव क्षीरसागर व पोलीस शिपाई श्री. गिरीश नेवसे यांच्या टीमने केली.

प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, अवैध साठा व विक्री करणाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी टाळता येईल अशा भ्रमात राहू नये.



प्रभारी पोलिस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन, 
पुणे ग्रामीण

No comments:

Post a Comment