बारामती परिसरात बुलेट चोरीच्या घटना; संशयितांचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

बारामती परिसरात बुलेट चोरीच्या घटना; संशयितांचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती..

बारामती परिसरात बुलेट चोरीच्या घटना; संशयितांचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती.. 
बारामती:- शहर व परिसरात मागील काही दिवसांत विशेषतः रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकली चोरीस जाण्याच्या घटना निदर्शनास आल्या असून, नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.* 

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अलीकडील काळात एकूण तीन बुलेट मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतदेखील तीन बुलेट मोटारसायकली चोरीस गेल्याची माहिती आहे. त्यामुळे बुलेट मोटारसायकलींना लक्ष्य करणारी चोरट्यांची टोळी परिसरात सक्रिय असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 317/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये दाखल गुन्ह्यात दि. 06/08/2026 रोजी रात्री 10.00 वा. ते दि. 07/08/2026 रोजी सकाळी 10.00 वा. या कालावधीत प्रगतीनगर येथील प्रभावती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दोन रॉयल एनफिल्ड मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. त्यामध्ये MH-42/AV-2121 क्रमांकाची Classic 350 तसेच MH-42/BK-0749 क्रमांकाची Hunter 350 अशा एकूण अंदाजे रु. 2,60,000/- किमतीच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.

तसेच बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 324/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये दाखल गुन्ह्यात दि. 09/08/2026 रोजी रात्री 11.00 वा. ते दि. 10/08/2026 रोजी सकाळी 07.00 वा. या कालावधीत तांदुळवाडी रोड, के-मार्ट पाठीमागील प्रगतीनगर येथील आर्या पॅराडाईस अपार्टमेंटच्या पार्किंगमधून MH-42/BK-9709 क्रमांकाची मेटल ग्रे रंगाची Royal Enfield Classic 350, अंदाजे किंमत रु. 1,10,000/-, चोरीस गेली आहे.

सदर घटनांच्या अनुषंगाने बारामती शहर पोलिसांनी परिसरातील विविध ठिकाणचे CCTV फुटेज प्राप्त करून त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू केले आहे. संशयित चोरट्यांच्या हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथके कार्यरत आहेत.

प्राथमिक निरीक्षणानुसार चोरटे अपार्टमेंट, सोसायटी तसेच तुलनेने कमी वर्दळीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बुलेट मोटारसायकलींना लक्ष्य करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ वाहनाचे नियमित हॅण्डल लॉक पुरेसे आहे असे समजू नये.

बारामती शहर पोलीस स्टेशनतर्फे सर्व दुचाकी वाहनधारकांना, विशेषतः Royal Enfield Bullet, Classic, Hunter तसेच तत्सम मोटारसायकलधारकांना पुढील खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे:

1. वाहन पार्क केल्यानंतर हॅण्डल लॉकसोबत स्वतंत्र मजबूत डिस्क लॉक, व्हील लॉक किंवा चेन लॉकचा वापर करावा.
2. शक्य असल्यास मोटारसायकलला स्थिर लोखंडी खांब किंवा सुरक्षित संरचनेला मजबूत चेन लॉकने बांधावे.
3. वाहन शक्यतो CCTV कॅमेऱ्याच्या स्पष्ट कव्हरेजमध्ये तसेच प्रकाश असलेल्या ठिकाणी पार्क करावे.
4. अपार्टमेंट व सोसायटी परिसरातील प्रवेशद्वार, पार्किंग आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर कार्यरत CCTV कॅमेरे आहेत की नाही याची नियमित खात्री करावी.
5. रात्रीच्या वेळेस संशयास्पद व्यक्ती वाहनांची पाहणी करताना, नंबर प्लेट पाहताना किंवा पार्किंग परिसरात विनाकारण फिरताना दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
6. शक्य असल्यास वाहनामध्ये GPS ट्रॅकर किंवा चोरीविरोधी अलार्म यंत्रणा बसवावी.
7. वाहनाची RC, इंजिन नंबर, चॅसी नंबर, वाहनाचे अलीकडील छायाचित्र तसेच दोन्ही बाजूंचे फोटो मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवावेत.
8. अनोळखी व्यक्तींकडून कमी दरात बुलेट किंवा तिचे सुटे भाग विक्रीसाठी देण्यात येत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.

आपल्या वाहनाची सुरक्षितता ही केवळ लॉक लावण्यापुरती मर्यादित न ठेवता एकापेक्षा अधिक सुरक्षा साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. काही सेकंदांची अतिरिक्त खबरदारी वाहन चोरीची घटना टाळू शकते.

बारामती शहर पोलिसांकडून सदर चोरीच्या घटनांचा गांभीर्याने तपास सुरू असून CCTV फुटेज, तांत्रिक माहिती तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे.

चोरीच्या घटनांशी संबंधित कोणतीही माहिती, संशयास्पद व्यक्ती किंवा वाहनाबाबत माहिती मिळाल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन अथवा डायल 112 वर तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख आवश्यकतेनुसार गोपनीय ठेवण्यात येईल.

*“सतर्क नागरिक आणि सक्रिय पोलीस यांचा समन्वय हा मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी योग्य सुरक्षा साधनांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे.”* 

प्रभारी पोलिस निरीक्षक 
बारामती शहर पोलीस स्टेशन
पुणे ग्रामीण

No comments:

Post a Comment