धक्कादायक.. बारामतीत प्रेमसंबंध असणाऱ्या मुलावर मुलीचा घातपात केल्याचा गंभीर आरोप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

धक्कादायक.. बारामतीत प्रेमसंबंध असणाऱ्या मुलावर मुलीचा घातपात केल्याचा गंभीर आरोप...

धक्कादायक.. बारामतीत प्रेमसंबंध असणाऱ्या मुलावर मुलीचा घातपात केल्याचा गंभीर आरोप...
बारामती :- बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील एका महिलेचा दिनांक 06/08/2026 रोजी आकस्मिक मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 325/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन मयत महिलेचे नाव व तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, तिच्या मुलीने बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि त्यानंतर ती एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑक्टोबर 2025 पासून पुणे येथे क्लास करीत होती. डिसेंबर 2025 च्या अखेरीस तिच्या मैत्रिणीकडून फिर्यादीस मुलीचे अथर्व राजेंद्र मेहन, वय 27 वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. गजानन अपार्टमेंट, हरिकृपानगर, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती, जि. पुणे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फिर्यादीने आपल्या मुलीशी फोन व व्हिडिओ कॉलद्वारे नियमित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. दिनांक 30/12/2025 रोजी फिर्यादी व तिचा भाऊ पुणे येथे जाऊन तिला बारामती येथे घेऊन आले. त्यानंतर आईने विचारणा केली असता मुलीने अथर्वसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

पुढे दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहासंदर्भात चर्चा झाली आणि दिनांक 12/04/2026 रोजी मुलीचे कुटुंबीय अथर्वच्या बारामती येथील घरी गेले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचा विवाह करण्याचे ठरले होते. त्यानंतर अथर्व व सदर महिला एकमेकांना भेटत होते तसेच फोनवर नियमित संपर्कात होते.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, घटना घडण्याच्या साधारण 15 ते 20 दिवस अगोदर मुलगी नेहमीपेक्षा शांत व गप्प राहत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यामुळे आईने तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता, अथर्व हा सदर महिलेकडे वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत असल्याचे तसेच तिला काही गोळ्या खाण्यास देत असल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीने तक्रारीत केला आहे.

दिनांक 06/08/2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता अथर्व हा कार घेऊन सदर महिलेला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज, बारामती येथे घेऊन गेला. त्याच दिवशी दुपारी सुमारे 4.00 वाजता तिने आईला मेसेज करून प्रवेश फीबाबत माहिती दिली तसेच ती व अथर्व हे अथर्वची आई व मावशी यांना सोडण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर आईने व्हिडिओ कॉल केला असता मुलगी अथर्वसोबत वाहनामध्ये असल्याचे दिसून आले आणि आईने तिला लवकर घरी परत येण्यास सांगितले.

सायंकाळी सुमारे 7.00 वाजता फिर्यादीने मुलीला दोन वेळा फोन केला, मात्र तिने फोन न उचलल्यामुळे फिर्यादीने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी फिर्यादीचे आपल्या मुलीशी बोलणे झाले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्या संभाषणात मुलीने आईला सांगितले की, अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे, त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत तसेच तो तिला गोळी खाण्यास देणार आहे. ही बाब ऐकल्यानंतर आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नये व तात्काळ घरी परत यावे, असे सांगितले.

रात्री सुमारे 9.00 वाजता आईने मुलीला ती कोठे आहे याबाबत मेसेज केला असता तिने जेवण करीत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर आईने केलेल्या पुढील मेसेजला मात्र कोणतेही उत्तर मिळाले नाही. रात्री सुमारे 10.00 वाजता फिर्यादीने मुलीच्या मोबाईलवर फोन केला असता फोन अथर्वने उचलला आणि त्याने सदर महिलेला चक्कर आली असल्याचे सांगून आईला घेण्यासाठी येत असल्याचे कळविले.

काही वेळाने अथर्व कार घेऊन फिर्यादीच्या घरी आला. त्याने सदर महिलेला अचानक चक्कर येऊन पडल्यामुळे प्रथम देवकाते हॉस्पिटल, बारामती, त्यानंतर भोंईटे हॉस्पिटल, बारामती आणि पुढे सिल्वर जुबली हॉस्पिटल, बारामती येथे नेण्यात आल्याची माहिती फिर्यादीस दिली. फिर्यादी रात्री सुमारे 10.20 वाजता सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे पोहोचली. तेथे तिची मुलगी स्ट्रेचरवर होती व तिची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीस समजले.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यानंतर अथर्वने तिला सांगितले की, तो सदर महिलेला त्याच्या गजानन अपार्टमेंट, बारामती येथील राहत्या घरी घेऊन गेला होता व तेथे त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाल्यानंतर तिला अचानक चक्कर आली. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूपूर्वी काही तास अगोदर सदर महिलेने स्वतःच्या आईला फोनवर अथर्व तिला गोळी खाण्यास देणार असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यापूर्वीही अथर्वकडून तिला काही गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून मिळाल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.

या सर्व घटनाक्रमामुळे फिर्यादीने आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरुद्ध गंभीर संशय व्यक्त करून कायदेशीर तक्रार दिली आहे. त्यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 325/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कलम हे सदोष मनुष्यवधाच्या स्वरूपात न येणाऱ्या अविचारी अथवा निष्काळजी कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडविण्याच्या अपराधाशी संबंधित आहे.

सदर प्रकरणात मृत्यूपूर्वी महिलेने आरोपी तिला गोळी खाण्यास देणार असल्याचे आईला सांगितल्याची बाब, यापूर्वीही आरोपीकडून काही गोळ्या दिल्या जात असल्याबाबतची फिर्यादीस मिळालेली माहिती तसेच आरोपीसोबत असताना महिलेची प्रकृती अचानक बिघडून तिचा मृत्यू झाल्याची परिस्थिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीकडून कोणते अविचारी अथवा निष्काळजी कृत्य झाले आहे किंवा कसे आणि त्याचा महिलेच्या मृत्यूशी कारणसंबंध आहे किंवा कसे, याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.

मयत महिलेला प्रत्यक्षात कोणती गोळी, औषध अथवा अन्य पदार्थ देण्यात आला होता किंवा नाही, दिला असल्यास तो कोणता पदार्थ होता, त्याचे सेवन झाले किंवा कसे, त्याचा तिच्या प्रकृतीवर काय परिणाम झाला, तिच्या मृत्यूशी त्याचा कारणसंबंध आहे किंवा कसे तसेच मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण काय आहे, या सर्व बाबींचा वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल, तांत्रिक व इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. तपासाच्या सद्यस्थितीत महिलेच्या मृत्यूच्या निश्चित कारणाबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. अजित पाटील हे करीत आहेत.

टीप - मयत महिलेचे नाव व तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.


प्रभारी पोलिस निरीक्षक 
बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण

No comments:

Post a Comment