प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी ₹६ लाख लाचेची मागणी; तडजोडीअंती ₹४ लाख स्वीकारताना लोकसेवक रंगेहात जेरबंद - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 25, 2026

प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी ₹६ लाख लाचेची मागणी; तडजोडीअंती ₹४ लाख स्वीकारताना लोकसेवक रंगेहात जेरबंद



बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी ₹६ लाख लाचेची मागणी; तडजोडीअंती ₹४ लाख स्वीकारताना लोकसेवक रंगेहात जेरबंद
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २८८/२०२६ हा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) चे कलम ७ अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील पोलीस निरीक्षक श्री. संतोष बुधा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

या गुन्ह्यातील आरोपी अनिल तुकाराम बनकर (वय ५१ वर्षे) हे बारामती एमआयडीसी डेपो येथे वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असून ते स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालक देखील आहेत.

तक्रारदार हे फर्निचर व्यवसायिक असून त्यांच्या जित वुडन फर्निचर या फर्ममार्फत स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईच्या बारामती शाखेच्या नवीन इमारतीतील फर्निचरचे काम संचालक मंडळाच्या ठरावानुसार करण्यात आले होते. या कामाची एकूण किंमत ₹४८,६०,४५५/- होती. त्यापैकी ₹४०,००,०००/- रक्कम तक्रारदारास प्राप्त झाली होती; मात्र ₹८,६०,४५५/- इतके फर्निचर कामाचे बिल, तसेच लाईट, सेफ्टी डोअर, पीओपी, पडदे, कार्पेट, रंगकाम आदी इतर कामांचे ₹४,९८,०००/- इतके बिल प्रलंबित होते. सदर रक्कम मंजूर करून मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू होती.

फिर्यादीनुसार, आरोपीने प्रलंबित बिले तसेच संबंधित ठेव रक्कम बँकेच्या वरिष्ठ स्तरावर मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडे प्रथम ₹५,००,०००/- लाचेची मागणी केली. तक्रारदाराने त्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतरही आरोपीने लाचेची मागणी कायम ठेवत संबंधित काम लाच दिल्याशिवाय होणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली. त्यानंतर तक्रारीची कायदेशीर पडताळणी स्वतंत्र पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी एकूण ₹६,००,०००/- लाचेची मागणी केली असून तडजोडीअंती ₹४,००,०००/- स्वीकारण्याचे मान्य केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

त्यानुसार दिनांक २३ जुलै २०२६ रोजी बारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. आरोपीने तक्रारदारास बारामती येथे भेटण्यास बोलावून प्रलंबित बिलांच्या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर बारामती एस.टी. बसस्थानकासमोरील बारामती–इंदापूर मार्गावरील परिसरात आरोपीने आपल्या ताब्यातील इर्टिगा मोटार कार क्रमांक एमएच ४२ बीई ५७८७ मध्ये पंच साक्षीदाराच्या उपस्थितीत तडजोडीनुसार ₹४,००,०००/- लाचेची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीस रंगेहात ताब्यात घेतले.

सदर कारवाईदरम्यान ₹४,००,०००/- लाचेची रक्कम, गुन्ह्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे, आरोपीचा मोबाईल फोन, गुन्ह्याच्या वेळी वापरण्यात आलेले वाहन तसेच इतर संबंधित मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आला आहे.

यानंतर आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २८८/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. सुहास हट्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे हे करीत आहेत.

तपासाच्या हिताच्या दृष्टीने सापळा कारवाईची कार्यपद्धती, ध्वनिमुद्रित संभाषणे, पंचनाम्यांतील तपशील, साक्षीदारांचे जबाब, इलेक्ट्रॉनिक पुरावे, वैज्ञानिक तपासणी, तपासाची दिशा तसेच इतर संवेदनशील माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

नागरिकांना आवाहन

कोणताही शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था, बँक, महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा सार्वजनिक कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या कायदेशीर कामासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे लाच, भेटवस्तू किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा मोबदला मागत असल्यास अशा मागणीस बळी पडू नये.

अशा वेळी नागरिकांनी लाच देण्याऐवजी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. मागणीची तारीख, वेळ, ठिकाण व संबंधित व्यक्तीची माहिती शक्य असल्यास सुरक्षित ठेवावी. तक्रारदाराची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात येते व प्रत्येक तक्रारीची कायदेशीर पडताळणी करून आवश्यक कारवाई केली जाते.

भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही केवळ शासकीय यंत्रणेची नसून समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाची आहे. आपल्या एका धाडसी निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो आणि सार्वजनिक प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख होऊ शकते.

"लाच देऊ नका... लाच मागितल्यास निर्भयपणे तक्रार करा. भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी आपले सहकार्य हीच सर्वात मोठी ताकद आहे."

प्रभारी पोलीस निरीक्षक 
बारामती शहर पोलीस स्टेशन

No comments:

Post a Comment