वारकरी सेवेसाठी हॉटेल मधुबनचा पुढाकार; बारामती नगरपरिषदेला २०० कोरोगेटेड बॉक्सचे योगदान* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 13, 2026

वारकरी सेवेसाठी हॉटेल मधुबनचा पुढाकार; बारामती नगरपरिषदेला २०० कोरोगेटेड बॉक्सचे योगदान*

*वारकरी सेवेसाठी हॉटेल मधुबनचा पुढाकार; बारामती नगरपरिषदेला २०० कोरोगेटेड बॉक्सचे योगदान*
बारामती, दि. १३. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि शहर स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बारामतीतील हॉटेल मधुबनचे संचालक सचिन झगडे यांनी दरसाल प्रमाणे यावर्षीही पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मातोश्री सौ. सुमन उद्धवराव झगडे यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेला स्वच्छता व्यवस्थेसाठी २०० कोरोगेटेड बॉक्स प्रदान करण्यात आले.

यासोबतच पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंटची व्यवस्था करण्यात येणार असून, भाविकांना पिण्याच्या पाण्याचेही वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत वारकरी सेवेसाठी उचललेले हे पाऊल सर्व स्तरांतून कौतुकास्पद मानले जात आहे.

यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, बांधकाम समिती सभापती अमर धुमाळ, पाणीपुरवठा समिती सभापती मनीषा समीर चव्हाण, मनीषा बनकर, गोरख पारसे, विशाल हिंगणे, अमोल कावळे, वैभव जगताप, ओंकार देशमुख 

आरोग्य विभाग प्रमुख स्वरूप अहिवाळे, अजय लालबिगे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालखी सोहळा हा बारामतीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून दरवर्षी लाखो वारकरी शहरात दाखल होत असतात. अशा वेळी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यांचे नियोजन प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. त्यात सामाजिक संस्था, व्यावसायिक आणि नागरिकांकडून मिळणारे सहकार्य प्रशासनाला अधिक बळ देणारे ठरत आहे.

▪️ चौकट :-
("आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीत येणारा पालखी सोहळा अधिक भव्य, दिव्य आणि दिमाखदार व्हावा यासाठी नेहमीच विशेष प्रयत्न केले. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार सुद्धा पालखी सोहळ्याच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा वेळी बारामती नगरपरिषदेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, उद्योजक आणि नागरिक पुढे येत आहेत, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीचे आणि संस्थेचे बारामती नगरपरिषदेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात येईल."
 - सचिन सातव
 नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद.)

▪️ चौकट :-
("पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी बारामती नगरपरिषद प्रशासन आणि कर्मचारी वर्ग मनापासून कार्यरत आहे. मात्र, आमच्या कार्याला अशा सेवाभावी संस्था आणि नागरिकांचा हातभार लाभत असल्यामुळे कर्मचारी वर्गाचा उत्साह अधिक वाढत आहे. या निमित्ताने बारामती नगरपरिषदेच्या वतीने आम्ही सर्व सामाजिक संस्था, उद्योजक आणि सेवाभावी नागरिकांना आवाहन करतो की, पालखी सोहळ्यासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करायची असल्यास त्यांनी पुढे यावे. प्रशासन अशा सर्व सहकार्याचे स्वागत करेल."
• पंकज भुसे
मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद.)

         -------------------------
वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या बारामतीकरांच्या परंपरेला साजेसा हा उपक्रम असून, हॉटेल मधुबन आणि सचिन झगडे परिवाराने दिलेले योगदान इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयाचे हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.

No comments:

Post a Comment