४७८ किलोच्या गूढ ड्रममागचा सूत्रधार अखेर अटकेत; बारामती शहर पोलिसांच्या तपासाने उघडले आंतरराज्यीय गांजा रॅकेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

४७८ किलोच्या गूढ ड्रममागचा सूत्रधार अखेर अटकेत; बारामती शहर पोलिसांच्या तपासाने उघडले आंतरराज्यीय गांजा रॅकेट..

 ४७८ किलोच्या गूढ ड्रममागचा सूत्रधार अखेर अटकेत; बारामती शहर पोलिसांच्या तपासाने उघडले आंतरराज्यीय गांजा रॅकेट..
बारामती :- जळोचीतील दोन ड्रमपासून सुरू झालेला तपास ओडिशापर्यंत; सांगलीतील १३४ किलो गांजा कारवाईतही आरोपीचा धागा — विकी विजय कांबळेस अटक करून दि. ०७/०९/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी

बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या तब्बल ४७८.९५० किलो गांजा जप्तीच्या गुन्ह्यातील आरोपी विकी विजय कांबळे, रा. भीमनगर, जळोची, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. तांदुळवाडी, ता. बारामती याचा कायदेशीर ताबा घेऊन बारामती शहर पोलिसांनी दि. ०२/०९/२०२६ रोजी रात्री २२.३० वा. त्यास गुन्ह्याच्या तपासात अटक केली आहे. त्यास दि. ०३/०९/२०२६ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, बारामती यांच्यासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची दि. ०७/०९/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या अटकेमागे जवळपास सहा महिन्यांचा सातत्यपूर्ण तपास, गुप्त माहितीचे जाळे, CDR व Dump Data विश्लेषण, मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, वाहनांच्या हालचालींची पडताळणी, सहआरोपींची चौकशी आणि पुणे ग्रामीण व सांगली पोलीस दलातील समन्वयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

*दोन गूढ ड्रम आणि तब्बल ४७८.९५० किलो गांजा* 

या प्रकरणाची सुरुवात दि. २८/०२/२०२६ रोजी झाली. मौजे जळोची, पिंपळी रोड, ता. बारामती येथील शेत परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती बारामती शहर पोलिसांना प्राप्त झाली होती.

पोलिसांनी पंच व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया करून घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे “SAMRUDDHI AQUA 6 LAYER FOOD MATERIAL UV STABILIZED – 1500 LTR” असे लिहिलेले दोन मोठे प्लास्टिक ड्रम मिळून आले.

दोन्ही ड्रमची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ४६५ पॅकेट्स मिळून आली. वजन केले असता त्यामध्ये तब्बल ४७८.९५० किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. सदर गांजाची अंदाजे किंमत रु. २,३९,४७,५००/- असून ड्रमसह एकूण रु. २,३९,४९,५००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७८/२०२६, NDPS Act कलम 20(b)(ii)(C), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

*ड्रम मिळाले; पण त्यामागचे चेहरे शोधण्याचे होते आव्हान* 

निर्जन शेतात दोन ड्रममध्ये जवळपास अर्धा टन गांजा मिळून आला होता. मात्र हा गांजा नेमका कोणी आणला, कोठून आणला, ड्रममध्ये कोणी भरला, जळोची येथे कोणी आणून ठेवला आणि पुढे कोणाकडे त्याचे वितरण होणार होते, याबाबत सुरुवातीला थेट माहिती उपलब्ध नव्हती.

बारामती शहर पोलिसांनी केवळ गांजा जप्त करून तपास थांबविला नाही. “या दोन ड्रममागे कोण?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तांत्रिक व पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

मोबाईल CDR, Dump Data, IMEI Mapping, घटनास्थळ परिसरातील मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, संशयितांच्या हालचाली, वाहनांचा वापर तसेच आरोपींच्या परस्पर संपर्कांचे विश्लेषण करण्यात आले.

या तपासातून प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग व जॉकी माझी यांचे धागे तपासात पुढे आले.

प्रकाश उर्फ पक्या काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग व राहुल गोरे यांना यापूर्वी गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतील माहितीची उपलब्ध तांत्रिक व इतर पुराव्यांच्या आधारे पडताळणी करत तपास पुढे नेण्यात आला.

*तपासाचा धागा ओडिशापर्यंत* 

तपास जसजसा पुढे गेला तसतसे गांजाची खरेदी, वाहतूक, साठवणूक व पुढील वितरणाच्या साखळीतील विकी विजय कांबळे याची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी येऊ लागली.

तपासामध्ये विकी कांबळे याचा ओडिशा राज्यातील जॉकी माझी याच्याशी संपर्क असल्याचा धागा समोर आला. त्याचबरोबर संग्राम उर्फ चंदन सिंग याच्या भूमिकेबाबतही तपास सुरू करण्यात आला. त्यामुळे जळोचीतील दोन ड्रममध्ये मिळालेला गांजा हा केवळ स्थानिक पातळीवरील व्यवहार नसून त्यामागे आंतरराज्यीय पुरवठा साखळी असण्याची शक्यता अधिक बळकट झाली.

*सांगलीत १३४ किलो गांजासह विकी कांबळे पकडला* 

दरम्यान विकी विजय कांबळे याच्या हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना प्राप्त झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी त्याचा मागोवा घेत संबंधित माहिती सांगली स्थानिक गुन्हे शाखेला दिली.

या माहितीच्या आधारे सांगली स्थानिक गुन्हे शाखा व कुपवाड MIDC पोलिसांनी कारवाई केली. संशयित इनोव्हा वाहनाचा पाठलाग करण्यात आला. पोलिसांना पाहून वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकी विजय कांबळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातील इनोव्हा वाहनाची तपासणी केली असता खाकी चिकटपट्टीने गुंडाळलेली ६६ पॅकेट्स व एक स्वतंत्र पिशवी असा एकूण १३४ किलो गांजा मिळून आला. सदर गांजाची किंमत अंदाजे रु. ३३,५०,०००/- होती. गांजा, इनोव्हा वाहन, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण रु. ४२,६३,५००/- किंमतीचा मुद्देमाल त्या कारवाईत जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणाच्या तपासातून गांजा ओडिशातून आणल्याचा तसेच त्याच्या पुढील वितरणाशी संबंधित महत्त्वाचे धागे समोर आले. त्यामुळे बारामतीतील गु.र.नं. ७८/२०२६ च्या तपासात आधीपासून समोर येत असलेल्या आंतरराज्यीय पुरवठा साखळीच्या दिशेला आणखी बळ मिळाले.

*गवारे चौकात दुसरी मोठी कारवाई; २३.०१० किलो गांजा जप्त* 

दि. २१/०५/२०२६ रोजी बारामतीमध्ये आणखी एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना चॉकलेटी रंगाच्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टा क्र. MH-02-EE-4949 मधून गांजा विक्रीसाठी फलटणकडून बारामतीच्या दिशेने आणला जात असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.

गवारे चौक, फलटण रोड येथे सापळा रचून संशयित वाहन अडविण्यात आले. वाहनात हुसेन सुखदेव लष्करे, आदित्य विकास शिंदे व युवराज ज्ञानेश्वर दुर्गे हे तीन इसम मिळून आले. वाहनाची तपासणी करणार असल्याचे सांगितल्यानंतर वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून तिघांनाही ताब्यात घेतले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केलेल्या झडतीत आरोपी आदित्य विकास शिंदे याच्या ताब्यातील हिरव्या पोपटी रंगाच्या गोणीत ११ पॅकेट्समध्ये एकूण २३ किलो ०१० ग्रॅम गांजा मिळून आला.

या कारवाईत गांजा, इनोव्हा क्रिस्टा वाहन व तीन मोबाईल असा एकूण रु. २१,८५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १९०/२०२६, NDPS Act कलम 8(c), 20(b)(ii)(C), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या तपासातही विकी विजय कांबळे व संग्राम उर्फ चंदन सिंग यांच्याशी संबंधित धागे समोर आल्याने बारामती शहर पोलीस स्टेशनच्या दोन्ही मोठ्या NDPS गुन्ह्यांचा तपास परस्पर जोडला गेला.

*दोन बारामती गुन्ह्यांतच ५०१.९६० किलो गांजा* 

बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७८/२०२६ मध्ये ४७८.९५० किलो आणि गु.र.नं. १९०/२०२६ मध्ये २३.०१० किलो, असा दोन्ही गुन्ह्यांत मिळून ५०१.९६० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

त्यासोबत सांगली-कुपवाड येथील विकी कांबळेशी संबंधित १३४ किलो गांजा जप्तीची स्वतंत्र कारवाई विचारात घेतल्यास या तपासातून समोर आलेल्या संबंधित धाग्यांची व्याप्ती ६३५.९६० किलो गांजापर्यंत पोहोचते.

*अखेर विकी विजय कांबळे बारामती पोलिसांच्या ताब्यात* 

गु.र.नं. ७८/२०२६ मध्ये विकी विजय कांबळे याच्याविरुद्ध तपासातून आवश्यक धागे समोर आल्यानंतर त्याचा कायदेशीर ताबा घेण्यात आला. त्यानंतर दि. ०२/०९/२०२६ रोजी रात्री २२.३० वा. त्यास बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गु.र.नं. ७८/२०२६ च्या तपासात अटक करण्यात आली.

अटकेवेळी आरोपीस अटकेची कारणे व त्याचे कायदेशीर अधिकार समजावून सांगून आवश्यक वैद्यकीय तपासणीसह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

दि. ०३/०९/२०२६ रोजी आरोपी विकी विजय कांबळे यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, बारामती यांच्यासमोर हजर करण्यात आले.

तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे यांनी आरोपीकडे गांजाचा मूळ स्रोत, ओडिशापासून बारामतीपर्यंतची पुरवठा साखळी, वाहतुकीसाठी वापरलेली वाहने, मोबाईल व सिमकार्ड, डिजिटल पुरावे, रोख/बँक/UPI व्यवहार, सहआरोपींची भूमिका, गांजा साठविण्याची ठिकाणे आणि संपूर्ण वितरण साखळीबाबत तपास करणे आवश्यक असल्याचे रिमांड अर्जामध्ये नमूद केले.

मा. न्यायालयाने FIR, रिमांड रिपोर्ट व केस डायरीचे अवलोकन करून गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, व्यावसायिक प्रमाणात जप्त झालेला अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या तपासाची आवश्यकता, आर्थिक व्यवहार तसेच आंतरराज्यीय अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा सखोल तपास करण्याची आवश्यकता विचारात घेत आरोपी विकी विजय कांबळे याची दि. ०७/०९/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

*दोन ड्रमपासून सुरू झालेला तपास आता संपूर्ण नेटवर्कच्या मुळाशी* 

दि. २८ फेब्रुवारी रोजी जळोचीच्या एका शेतात मिळालेल्या दोन गूढ ड्रमपासून सुरू झालेला तपास आता गांजाचा मूळ स्रोत, त्याची आंतरराज्यीय वाहतूक, बारामतीतील साठवणूक, स्थानिक वितरण, वाहने, मोबाईल संपर्क आणि आर्थिक व्यवहारांपर्यंत पोहोचला आहे.

या तपासात पारंपरिक पोलीस तपासाबरोबरच तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रत्येक छोट्या धाग्याची पडताळणी करून एकामागून एक आरोपी आणि त्यांच्या परस्पर संबंधांपर्यंत पोहोचण्यात आले. सांगली पोलिसांशी करण्यात आलेल्या समन्वयामुळे तपासाला आणखी महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

अंमली पदार्थांच्या व्यवहारात जिल्हा अथवा राज्याच्या सीमा गुन्हेगारांना संरक्षण देऊ शकत नाहीत. गुप्त माहिती, तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध पोलीस घटकांतील समन्वयाच्या बळावर अशा नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा बारामती शहर पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध, ओडिशातील मूळ पुरवठा साखळी, संग्राम उर्फ चंदन सिंग व जॉकी माझी यांची भूमिका, गांजा वाहतुकीसाठी वापरलेली वाहने, मोबाईल व डिजिटल उपकरणे तसेच आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असून संपूर्ण source-to-destination chain उघड करण्याच्या दृष्टीने पुढील सखोल तपास करण्यात येत आहे.

सदर संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कारंडे तसेच बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदारांनी या तपासासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक 
बारामती शहर पोलीस स्टेशन

No comments:

Post a Comment