शेअर मार्केटमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष; कार्तिक नाळे व गौरव नाळे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल..
*लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचा तपास; बँक खाती, डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग व्यवहार व मनी ट्रेलची सखोल पडताळणी सुरू*
*दोन्ही आरोपी सध्या फरार; शोधासाठी विशेष प्रयत्न सुरू, लवकरच आरोपींना गजाआड करण्याचा पोलिसांचा निर्धार*
*नाळे बंधूंविरुद्ध अशाच स्वरूपाची तक्रार असल्यास बारामती शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे नागरिकांना आवाहन*
बारामती, दि. 06 सप्टेंबर 2026 :
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली गुंतवणूक केल्यास आकर्षक व निश्चित परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून त्यानंतर मूळ गुंतवणूक व ठरलेला परतावा न दिल्याच्या आरोपांवरून कार्तिक अरविंद नाळे व गौरव अरविंद नाळे, दोघे रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
या दोन्ही प्रकरणांचा तपास व्यापक स्वरूपात सुरू असून आरोपींनी स्वीकारलेली रक्कम नेमकी कोठे वळविण्यात आली, ती प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यात आली होती किंवा नाही, संबंधित बँक खाती, डीमॅट खाती, ट्रेडिंग अकाउंट, ब्रोकर व्यवहार, लाभार्थी खाती, डिजिटल व्यवहार, मालमत्ता तसेच संपूर्ण Money Trail तपासण्याचे काम बारामती शहर पोलिसांकडून सुरू आहे.
पहिला गुन्हा : गु.र.नं. 249/2026
बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 249/2026 हा गुन्हा भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 316(2), 318, 340, 3(5) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, 1999 (MPID Act) चे कलम 3 अन्वये दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध पोलीस अभिलेखानुसार या गुन्ह्यात कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे तसेच BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE या नावाचा उल्लेख असून संबंधित व्यवसायाचे ठिकाण पंचायत समितीच्या मागे, आनंदनगर, भिगवण रोड, बारामती असे नमूद आहे.
सदर प्रकरणामध्ये फिर्यादी सोहेल कुतुबुद्दीन इनामदार यांनी आरोपींनी शेअर मार्केट ट्रेडिंग/गुंतवणुकीच्या माध्यमातून निश्चित परताव्याचे आश्वासन देऊन रक्कम स्वीकारल्याचा आरोप केला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान इतर गुंतवणूकदार व आर्थिक व्यवहारांची माहितीही समोर आली असून संबंधितांच्या जबाबांसह करारनामे, बँक व्यवहार व इतर आर्थिक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. गु.र.नं. 249/2026 मध्ये आरोपी म्हणून कार्तिक नाळे व गौरव नाळे यांची नोंद असून BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE चादेखील उल्लेख पोलीस अभिलेखात आहे.
दुसरा गुन्हा : गु.र.नं. 361/2026
दरम्यान, फिर्यादी रणजित बाळासो शिंदे, वय 40 वर्षे, व्यवसाय शेती/मार्केटिंग, रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात दिनांक 03/09/2026 रोजी गु.र.नं. 361/2026 दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा भारतीय दंड संहिता (IPC) कलम 406, 409, 420 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, 1999 (MPID Act) कलम 3 व 4 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रणजित शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आरोपी कार्तिक नाळे व गौरव नाळे यांनी बारामती येथील त्यांच्या शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व निश्चित परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने स्वतःची बचत, कर्जातून मिळालेली रक्कम व नातेवाईकांकडून उसने घेतलेली रक्कम अशा विविध स्रोतांतून आरोपींकडे रोख तसेच बँक व्यवहाराद्वारे वेळोवेळी एकूण रु.22,00,000/- गुंतवणुकीसाठी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या व्यवहारांमध्ये आरोपी कार्तिक नाळे यांच्या Axis Bank खात्यात तसेच आरोपी गौरव नाळे यांच्या HDFC Bank खात्यात विविध तारखांना रक्कम जमा केल्याचे नमूद असून एका व्यवहारात रोख रक्कमदेखील दिल्याचा उल्लेख आहे. दिनांक 01/09/2022 रोजी रु.5,00,000/- गुंतवणुकीच्या अनुषंगाने नोटरीकृत करारनामा करण्यात आला होता. त्यामध्ये दरमहा 10 टक्के म्हणजे रु.50,000/- परतावा देण्याची अट असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
सुरुवातीच्या कालावधीत काही रक्कम परतावा म्हणून मिळाल्याने आरोपींवरील विश्वास वाढल्याचे आणि त्यानंतर अधिक रक्कम गुंतविल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. मात्र पुढे नियमित परतावा बंद झाला. सप्टेंबर 2023 नंतर आरोपींकडे विचारणा केली असता बँक अकाऊंटमध्ये अडचण असल्याचे तसेच पैसे पुढे गुंतविले असून अकाऊंट लॉक झाल्याचे कारण सांगण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीने यापूर्वी केलेल्या तक्रारीनंतर न्यायालयात Cri.M.A. No. 76/2024, Ranjit Balaso Shinde Vs. Kartik Nale and Anr. हा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहारांचा प्रत्येक धागा तपासला जाणार
दोन्ही गुन्ह्यांमध्ये प्रथमदर्शनी दिसणाऱ्या व्यवहार पद्धतीची तुलना करून तपास करण्यात येत आहे. आरोपींनी वेगवेगळ्या व्यक्तींकडून स्वीकारलेल्या रकमा कोणत्या बँक खात्यांमध्ये जमा केल्या, त्या रकमा पुढे कोणत्या खात्यांमध्ये वळविल्या, आरोपी अथवा त्यांच्या संबंधित व्यक्तींच्या नावाने डीमॅट किंवा ट्रेडिंग खाती आहेत का, त्या खात्यांमधून प्रत्यक्ष शेअर मार्केट व्यवहार झाले का, गुंतवणूकदारांच्या रकमेच्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली का, नफा अथवा तोटा झाला का, याची तांत्रिक व आर्थिक पडताळणी सुरू आहे.
यासोबतच संबंधित बँक खाते स्टेटमेंट, KYC कागदपत्रे, UPI/IMPS/NEFT/RTGS व्यवहार, डीमॅट होल्डिंग्ज, ट्रेडिंग लेजर, ब्रोकर स्टेटमेंट, निधीचे पुढील लाभार्थी, संबंधित संस्था/व्यवसायाची नोंदणी तसेच स्थावर-जंगम मालमत्ता यांचा तपास केला जात आहे. आवश्यकतेनुसार संबंधित बँका, आर्थिक संस्था, डिपॉझिटरी तसेच नियामक यंत्रणांकडून माहिती मागविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
आरोपी फरार; शोधासाठी पोलिसांची पथके कार्यरत
दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी कार्तिक अरविंद नाळे व गौरव अरविंद नाळे हे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींचे संभाव्य वास्तव्य, संपर्कातील व्यक्ती, मोबाईल व इतर तांत्रिक माहिती तसेच उपलब्ध तपासाच्या आधारे त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
बारामती शहर पोलिसांकडून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून लवकरच दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
इतर गुंतवणूकदारांनी पुढे यावे
कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे किंवा त्यांच्या संबंधित BIG BULL TRADING / BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE अथवा अन्य ट्रेडिंग/इन्व्हेस्टमेंट व्यवसायाच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, निश्चित परतावा, मासिक नफा किंवा मूळ रक्कम सुरक्षित असल्याचे सांगून कोणाकडून रक्कम स्वीकारण्यात आली असेल आणि संबंधित व्यक्तीची रक्कम/परतावा अद्याप प्राप्त झालेला नसेल, तर अशा व्यक्तींनी निर्भयपणे पुढे येऊन बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित नागरिकांनी शक्य असल्यास करारनामा, पावती, बँक स्टेटमेंट, चेक, UPI/NEFT/IMPS तपशील, WhatsApp संभाषण, ई-मेल, जाहिरात, ट्रेडिंग स्क्रीनशॉट, डीमॅट/पोर्टफोलिओ स्टेटमेंट किंवा अन्य उपलब्ध पुरावे सोबत आणावेत. प्राप्त प्रत्येक तक्रारीची स्वतंत्रपणे पडताळणी करून ती चालू तपासाशी संबंधित असल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार समाविष्ट करण्यात येईल.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून गु.र.नं. 361/2026 चा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.
नागरिकांनी अवास्तव किंवा हमखास परताव्याच्या आमिषाला बळी न पडता कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था, व्यक्ती व त्यांच्या नियामक नोंदणीची अधिकृत स्तरावर खातरजमा करावी, असे बारामती शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
प्रभारी पोलिस निरीक्षक
बारामती शहर पोलिस स्टेशन
No comments:
Post a Comment