बारामतीत टी.सी.कॉलेज परिसरात बारामती वाहतूक शाखेची अचानक धडक नाकाबंदी;७८ वाहतूक नियमभंग प्रकरणांत ₹५९,००० दंड; अल्पवयीन वाहनचालकांवर १३ स्वतंत्र कारवाया..
*महिला विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम*
बारामती :- बारामती शहरातील महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, छेडछाडीच्या प्रकारांना प्रतिबंध व्हावा तसेच महाविद्यालय परिसरात वेगाने, बेदरकारपणे व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी नियंत्रण निर्माण व्हावे, या उद्देशाने मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेकडून विशेष धडक कारवाई करण्यात आली.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सुरक्षितता, कॉलेज परिसरातील बेदरकार वाहनचालक, ट्रिपल सीट, परवाना नसताना वाहन चालविणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अचानक नाकाबंदी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली Tuljaram Chaturchand College, Baramati येथील गेटसमोर दि. ०४/०९/२०२६ रोजी सकाळी १०.०० ते १३.०० वाजेपर्यंत अचानक नाकाबंदी आयोजित करण्यात आली.
सदर कारवाईत बारामती वाहतूक शाखेचे १९ पोलीस अंमलदार तसेच १ आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने सदर नाकाबंदी प्रभावीपणे राबविण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली. उपलब्ध कारवाई पत्रकानुसार एकूण ७८ केसेस करून ₹५९,००० दंडाची कारवाई करण्यात आली.
कोणत्या हेडखाली किती कारवाई
नो पार्किंग — ३ केसेस — ₹२,५०० दंड
ट्रिपल सीट — १ केस — ₹१,००० दंड
लायसन्स नसणे — २ केसेस — ₹१०,००० दंड
लायसन्स जवळ न बाळगणे — ३६ केसेस — ₹२०,००० दंड
नंबर प्लेट ब्रोकन — २१ केसेस — ₹१३,००० दंड
मोबाईल संभाषण करत वाहन चालविणे — १ केस — ₹१,००० दंड
काळी काच — ३ केसेस — ₹३,५०० दंड
पोलीस इशारा — १ केस — ₹१,५०० दंड
विदाउट एच.एस.आर.पी. — १ केस — ₹५०० दंड
वाहनात बदल करणे — १ केस — ₹१,००० दंड
इतर केसेस — ८ केसेस — ₹५,००० दंड
याशिवाय नो एन्ट्री, नो सीटबेल्ट, विदाउट हेल्मेट, विदाउट इन्शुरन्स, विदाउट क्लिनर, विदाउट रेड रिफ्लेक्टर, अवैध प्रवासी वाहतूक तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ या बाबींचीही तपासणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, अल्पवयीन मुले-मुली वाहन चालवत असल्याबाबत १३ स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे त्यांच्या स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
*विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य — श्री. चैतन्य कदम*
महाविद्यालय सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत परिसरात विनाकारण वाहने फिरविणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, छेडछाडीला कारणीभूत ठरणारे वर्तन करणे, मोठ्या आवाजात अथवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे किंवा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक अडथळा निर्माण करणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन परिसरांमध्ये विशेष प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर देण्यात येत आहे.
“महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला सुरक्षित वाटले पाहिजे आणि नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना अथवा नागरिकांना बेदरकार वाहनचालकांमुळे त्रास होता कामा नये,” या भूमिकेतून अशा प्रकारच्या अचानक नाकाबंदी मोहिमा यापुढेही राबविण्यात येणार आहेत.
वाहतूक पोलिसांची उपस्थिती एखाद्या ठरावीक ठिकाणी किंवा ठरावीक वेळेतच राहणार नसून महाविद्यालये, शाळा, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नाकाबंदी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार सक्त कारवाई केली जाईल.
*पालक व विद्यार्थ्यांना आवाहन*
विद्यार्थ्यांनी वैध वाहन परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये, ट्रिपल सीट प्रवास करू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, वेगाने अथवा बेदरकारपणे वाहन चालवू नये तसेच वाहनाच्या नंबर प्लेट व आवश्यक कागदपत्रांबाबत नियमांचे पालन करावे. पालकांनीही अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन देऊ नये.
मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अशा अचानक नाकाबंदी आणि धडक वाहतूक कारवाया यापुढेही सातत्याने करण्यात येणार असून, महिला व विद्यार्थिनींची सुरक्षितता तसेच सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था राखण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.
*“नियम पाळणाऱ्यांना संरक्षण — बेदरकार वाहनचालकांवर कायद्याची सक्त कारवाई”*
(महेश स्वामी)
पोलीस निरीक्षक
बारामती वाहतूक शाखा
पुणे ग्रामीण पोलीस
No comments:
Post a Comment